जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सत्तरी तालुक्यात पूरसदृश्य स्थिती

नद्यांची पातळी वाढली; पिसुर्लेत महिलेचे घर कोसळले

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः गेल्या दोन दिवसांपासून सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावाचे रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. दरम्यान पिसुर्ले याठिकाणी एका हरिजन महिलेचे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

हेही वाचाः डिचोली तालुक्यात मुसळधार चालूच

गेल्या दोन दिवसापासून सत्तरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय. प्राप्त माहितीनुसार गेल्या 24 तासात 7 इंच पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस लागत होता. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

हेही वाचाः पेडणे राष्ट्रीय महामार्गाची स्थिती भयानक

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून मंगळवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी धोकादायक अवस्थेत पोचल्याचं पहायला मिळाली. यामुळे सरकारची यंत्रणा सतर्क झाली आहे. पाण्याच्या पातळीत आणखीन वाढ झाल्यास नदीच्याकाठी असलेल्या लोकवस्ती संदर्भात उपाय योजना करण्यात येणार असल्याचं सरकारच्यावतीने स्पष्ट केलं आहे. सत्तरी तालुक्यातील म्हादई, वाळवंटी, रगडा, वेळूस या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. डोंगराळ भागांमध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात नदीला मिळत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे.

रस्ते पाण्याखाली वाहतूक ठप्प

दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्यातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळपई नगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीचा प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण होताना दिसत आहे. वाळपई- ठाणे रस्त्यावर कोपार्डे याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली. त्याचप्रमाणे वाळपई शहरातून गुळेली, सोनाळ आदी भागातील रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. होंडा येथील प्रमुख रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचाः VIDEO | भयानक दुर्घटना! दुचाकी-कारची धडक

चोर्ला घाट परिसरात झाडे पडण्याचे प्रकार

एकूण मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा वाहत असल्यामुळे चोर्ला घाट परिसरामध्ये प्रमुख रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार घडताना दिसत आहेत. अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री तीन ठिकाणी झाडे पडली होती. सदर झाडे हटवण्यात आली. यामुळे काही प्रमाणात वाहतुक ठप्प झाली होती.  मंगळवारी दिवसभर सदर भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.

हेही वाचाः …या गावानं रचला विक्रम ! 100 टक्के लसीकरणाची मोहीम फत्ते

पिसुर्लेत घर कोसळले

पिसुर्ले सातरी येथील अनुराधा अंकुश परवार यांचे घर कोसळल्याने हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सदर घराची नुकसानी झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराचा निम्मा भाग कोसळला असून यामुळे इतर भागही  असुरक्षित बनला आहे. यामुळे सदर कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. सरकारने यासंदर्भात ताबडतोब दखल घेऊन या महिलेला आर्थिक सहकार्य करावं अशी मागणी कुटुबांने केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!