राज्यातील वीजेची समस्या त्वरित दूर करा!

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सची मागणीः औद्योगिक क्षेत्राला अखंडित वीज द्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याला ५०० मेगावॅट विजेची गरज आहे. उन्हाळ्यात उष्मा वाढल्यानंतर पंखे, वातानुकुलित यंत्र सुरू राहिल्यामुळे विजेची मागणी वाढते. सरकारी कार्यालयांतही दिवसभर पंखे, वातानुकुलित यंत्रे सुरू ठेवावी लागतात. वीज खंडित झाल्यास रात्री झोपही पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात राज्याची विजेची मागणी ५५० मेगावॅट इतकी असते. घरगुती वापर वाढल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे उद्योजकांना जनरेटरचा आधार घ्यावा लागतो. जनरेटरमुळे उत्पादनाचा खर्च वाढतो.

लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रीप

लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रीप होतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरावर जितक्या घरांतील वीजजोडण्या असतात, त्या सर्वत्रचा वीज पुरवठा खंडित होतो. मागील वर्षी तूट भरून काढण्यासाठी वीज खात्याने खुल्या बाजारातून वाढीव दराने विजेची खरेदी केली होती. उद्येजकांककडून विजेसाठीचे अतिरिक्त पैसे सरकारने वसूल केले होते. यंदाही उन्हाळ्यात विजेची कमतरता जाणवण्याची भीती आहे. उन्हाळ्यात विजेची कमी भासू नये म्हणून वीज खात्याने उपाययोजना करावी, अशी मागणी गोवा चेंबरने केली आहे.

विजेची आवश्यकता लक्षात घेऊन विजेची खरेदी करावी

उन्हाळ्यातील विजेची आवश्यकता लक्षात घेऊन विजेची खरेदी करावी, अशी मागणीही गोवा चेंबरने केली आहे. वेर्णा येथे नवा ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी निविदा जारी झाली होती. ही निविदा आता रद्द करण्यात आली आहे. वेर्णा सबस्टेशनमध्ये नव्या ट्रॉन्स्फॉर्मरा- ची गरज आहे. ट्रान्सफॉर्मर नसल्याने वेर्णा औद्योगिक वसाहतीत विजेची समस्या आहे. विजेची कमतरता दूर होण्यासाठी तमनारसारख्या प्रकल्पाची गरज आहे. तमनार प्रकल्प झाला तर देशातील कोणत्याही ठिकाणाहून वीज घेणे गोव्याला शक्य होणार आहे. मूलभूत सुविधा जुन्या, जीर्ण झाल्याने घरगुती तसेच औद्योगिक ग्राहकांना फटका बसत आहे, अशी माहिती उद्योजकांनी दिली आहे.
स्वतंत्र वीज प्रकल्प गरजेचा !

उपाययोजना करणे आवश्यक

खंडित वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोव्याची स्वतंत्र वीज निर्मिती यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. असा प्रकल्प साकारल्यास राज्यातील विजेची समस्या दूर होऊ शकते. कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, काही भागांत अधूनमधून होणारे लोड शेडिंग असे प्रकार नव्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे कायमस्वरूपी निकाली निघतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!