पाच गुन्हे, १३ गजाआड; २.३१ किलोचा ड्रग्ज जप्त

मुंबई एनसीबीची आतापर्यंतची यशस्वी कारवाई; संशयितांत स्थानिकांसह विदेशींचाही सहभाग

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: करोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. असं असताना गोव्यात मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणांवर कारवाई केली आहे. एनसीबीने पहिल्यांदाच राज्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक करून त्यांच्याकडून २ किलो ३१.४०६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला आहे. तर अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये चार विदेशी नागरिकांपैकी दोन अट्टल अमली पदार्थ तस्कर आहेत.

हेही वाचाः पेडणे तालुक्यात एक-चौदाचा उतारा ऑनलाईन मिळवण्यात अडचणी

७ – ८ मार्च रोजी आसगावातील दोन बंगल्यांवर छापा

एनसीबी गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने अमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत. यातील पहिला गुन्हा ७ मार्च रोजी मध्यरात्री आणि ८ रोजी पहाटे आसगाव (बार्देश) येथील दोन बंगल्यांवर छापा टाकून उगोचुक्वू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) आणि जॉन इन्फिनिटी ऊर्फ डेव्हिड (काँगो) या विदेशी नागरिकांना अटक केली होती. त्या कारवाईवेळी गोमंतकीय संशयित प्रसाद वाळके बेपत्ता झाला होता. कारवाईत एनसीबीने ०.७ ग्रॅम एलएसडी, ४१ ब्लॉट, २८ ग्रॅम चरस, २२ ग्रॅम कोकेन, १.१०० किलो गांजा, १६० ग्रॅम पांढरी पूड, ५०० ग्रॅम निळ्या रंगाचा अमली पदार्थ आणि १० हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.

हेही वाचाः जीसीझेडएमपीसाठीची फेर जनसुनावणी आता 8 जुलै रोजी

७ मार्चला मोरजी येथील शॅकवर कारवाई

एनसीबीने दुसरा गुन्हा सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आणि ड्रग्स व्यवसाय प्रकरणात सहभाग असलेला आणि न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अनुज केशवानी याला अमली पदार्थ पुरवणाऱ्या संशयित हेमंत शहाच्या विरोधात दाखल केला. आहे. एनसीबीने ही कारवाई रविवार, ७ मार्च रोजी मोरजी येथील एका शॅकवर केली होती. कारवाईत संशयित शहा याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पथकाने तो राहत असलेल्या मिरामार येथील सदनिकेची झडती घेतली. या कारवाईत एलएसडीचे १५ ब्लॉट आणि ३० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले आहे.

हेही वाचाः एटीएस कमांडो जयदेव सावंत सेवेत दाखल

११ मार्चला नोबल मार्क बॅरोटाला अटक, तर १३ मार्चला ‘शिवा प्लेस’ रेस्टॉरंटमधील रेव्ह पार्टी उधळली

एनसीबीने ११ मार्च रोजी तिसरा गुन्हा दाखल करून नोबल मार्क बॅरोटा याला अटक केली आहे. त्याच्याकडून १४.२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. चौथा गुन्हा गोव्यातील क्राईम ब्रांचच्या सहकार्याने शुक्रवार, १३ मार्च रोजी दाखल करण्यात आला होता. या कारवाईत त्या रात्री वझरांत (वागातोर) येथील ‘शिवा प्लेस’ रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टी उधळून लावण्यात आली होती. त्यावेळी केरळ येथील निजिल राजा व निहाद चेठी प्रंबाथ यांच्यासह केनी मार्को फ्रिस्चेनेच या स्वीडिश नागरिकाला अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर अजिंक्य कालेकर व जोएल मेंडोसा या स्थानिक संशयितांनाही गजाआड करण्यात आले होते. या कारवाईत १५ ग्रॅम एलएसडी, ५.१ ग्रॅम मेफेड्रोन, ०.३६ ग्रॅम हिरॉईन, २.२ ग्रॅम हशीष, १५.१ ग्रॅम गांजा, १.२ ग्रॅम एमडीएमए व इतर मिळून ५७.९३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचाः कोरोना रुग्णवाढ 1 लाखाच्या आत! 66 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण

३० एप्रिलला ‘नेगी कॅफे’ शॅकवर छापा

एनसीबीने पाचवा गुन्हा शुक्रवार, ३० एप्रिल रोजी सकाळी हरमल येथील ‘नेगी कॅफे’ शॅकवर छापा टाकून दाखल केला होता. यामध्ये शॅकचा केअर टेकर रणबीर सिंग याला आणि मालक भुपेंद्रर सिंग नेगी याच्यासह नायजे‌रियाचा अट्टल तस्कर माडूका चिराह ऊर्फ टायगर मुस्तफा याला बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांसह हणजूण येथील ‘कॅजी ईन’ या गेस्ट हाऊसचा मालक कॅजिटन फर्नांडिसला अटक केली होती. या कारवाईत ५८ ग्रॅम मॅथाफेटामाइन, ०.२४६ ग्रॅम एलएसडी, ६.०६ ग्रॅम एमडी, १२.९ ग्रॅम कोकेन, १०.६४ ग्रॅम हेरॉईन (ब्राऊन शुगर), ३.४२ ग्रॅम हेरॉईन (लाईट येलो), ३.४६ ग्रॅम गांजा आणि ०.८५ ग्रॅम एक्स्टसी अमली पदार्थ जप्त केले आहेत.

हेही वाचाः गोव्यात अनलॉक प्रक्रिया कधीपासून? मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ तारीख

पाच गुन्ह्यात २.३१ किलो ड्रग्ज जप्त

एनसीबीने पाचही प्रकरणांत अमली पदार्थविरोधी कायदा १९८५ च्या कलम ८(सी), २०(बी)ए, २७ (ए), २९ व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणांत मिळून एनसीबीने २ किलो ३१.४०६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या १३ संशयितांपैकी ५ परप्रांतीय, ४ गोमंतकीय तर ४ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!