नगरपालिका निवडणूक : मतदानाच्या टक्केवारीत घट

पहिल्या टप्प्याच्या तुलनेत मतदारांत निरुत्साह

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पाच नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मार्चमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून आली. एकूण सरासरी मतदान 66.70 टक्के नोंदवण्यात आलं.

सांगेत सर्वाधिक 81.49 टक्के मतदान

कोविड उद्रेकाच्या सावटाखाली राज्यातील पाच नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. पैकी सांगे नगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 81.49 टक्के मतदान नोंदवण्यात आलं. म्हापशात 68.57 टक्के, मडगावात 64.25 टक्के, मुरगावात 65.04 टक्के, तर केपेत 78.01 टक्के मतदान झालं. शहरी नगरपालिकांच्या तुलनेत ग्रामीण नगरपालिकांत अधिक मतदान झाल्याचं दिसून आलं.

वेळ्ळी, कारापूर-सर्वणमध्ये समाधानकारक मतदान

वेळ्ळीत पंचायत वॉर्ड क्र. 4च्या पोटनिवडणुकीसाठी 65.59 टक्के, तर कारापूर-सर्वणमध्ये वॉर्ड क्र. 2च्या पोटनिवडणुकीसाठी 85.96 टक्के मतदान झालं. कारापूर-सर्वणच्या तुलनेत वेळ्ळीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला.

कोविडबाधितांनी बजावला मतदानाचा अधिकार

म्हापसा आणि सांगेत कोविडबाधित मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पीपीई कीट घालून या मतदारांनी मतदान केंद्रात हजेरी लावली. संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत कोविडबाधित मतदारांना एक तास राखीव ठेवला होता. अनेक कोविडबाधितांनी या एक तासात मतदान केलं. सांगे नगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 6 मध्ये कोरानाबाधित मतदारांनी मतदान केलं.

पहिल्या टप्प्यात झालं होतं 83.19 टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात 20 मार्चला घेतलेल्या पाच नगरपालिकांसाठी सरासरी मतदान 83.19 टक्के झालं होतं. पेडणे, डिचोली, वाळपई, कुडचडे-काकोडा, कुंकळ्ळी आणि काणकोणसह पणजी महापालिकेची निवडणूक पहिल्या टप्प्यात पार पडली होती. त्यावेळी कोविडचा प्रादूर्भाव नियंत्रणात होता. पेडणे नगरपालिकेसाठी सर्वाधिक 91.02 टक्के मतदान नोंद झालं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!