पहिल्या दोन तासांत 16.03 टक्के मतदान

नगरपालिका निवडणूक : मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोविडच्या सावटाखाली होत असलेल्या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत 16.03 टक्के मतदानाची नोंद झाली.

10 वाजेपर्यंत पहिल्या दोन तासांत सांगेत 24.22 टक्के, तर केपेत 17.75 टक्के मतदान झालं. मुरगाव नरपालिकेसाठी पहिल्या दोन तासांत 13.77 टक्के मतदान झालं. मडगावात 16.71 टक्के, तर म्हापशात 17.37 टक्के मतदान झालं.

एकूण 1 लाख 85 हजार 255 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. 231 पोलिंग बुथवर मतदान होत असून 124 मतदान केंद्रं आहेत. सकाळी 8 वाजता सुरू झालेलं मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. कोविड एसओपींचं पालन करून मतदान होतंय. पाचही नगरपालिका क्षेत्रात मतदानानिमित्त सर्व ती खबरदारी प्रशासनानं घेतलीय. कोविडच्या छायेतही सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवलाय. म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाचही नगरपालिका क्षेत्रात मतदार सकाळीच घराबाहेर पडल्याचं दिसून आलं.

कोविड रुग्णांना एक तास राखीव

कोरानाबाधित असलेल्या मतदारांसाठी संध्याकाळी 4 ते 5 हा एक तास मतदानाकरिता राखीव ठेवण्यात आलाय. या काळात कोविडबाधित मतदान करू शकतील. त्यासाठी संबंधित मतदानकेंद्रांवर सर्व ती व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!