पाच नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात

संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत कोविड रुग्णांना मतदान राखीव

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या नगरपालिकांसाठी हे मतदान होतंय.

एकूण 231 पोलिंग बुथवर मतदान होत असून 124 मतदान केंद्रं आहेत. सकाळी 8 वाजता सुरू झालेलं मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. कोविड एसओपींचं पालन करून मतदान होतंय. पाचही नगरपालिका क्षेत्रात मतदानानिमित्त सर्व ती खबरदारी प्रशासनानं घेतलीय. कोविडच्या छायेतही सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवलाय. म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाचही नगरपालिका क्षेत्रात मतदार सकाळीच घराबाहेर पडल्याचं दिसून आलं.

कोविड रुग्णांना एक तास राखीव

कोरानाबाधित असलेल्या मतदारांसाठी संध्याकाळी 4 ते 5 हा एक तास मतदानाकरिता राखीव ठेवण्यात आलाय. या काळात कोविडबाधित मतदान करू शकतील. त्यासाठी संबंधित मतदानकेंद्रांवर सर्व ती व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानाचा टक्का वाढणार का?

1 लाख 85 हजार 255 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मात्र कोविडच्या प्रादूर्भावाची शक्यता लक्षात घेता, मतदार घराबाहेर पडणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही प्रयत्न केले. मात्र मतदार त्याला किती प्रतिसाद देतात, यावर सर्व काही अवलंबून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!