पाच आमदार काँग्रेसच्या संपर्कात

निवडणुकीच्या तोंडावर भाजप, गोवा फॉरवर्डला हादरे शक्य; दिवाळीपर्यंत राजकीय समीकरणे बदलणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे दोन, गोवा फॉरवर्डचा एक आणि प्रसाद गावकर यांच्यासह आणखी एक अपक्ष असे पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यासाठीचे सर्व नियोजन झाले आहे. दिवाळीच्या दरम्यान याबाबत प्रत्यक्ष कृती केली जाईल.
वरवर काँग्रेसमध्ये सामसूम दिसत असली तरीही काँग्रेसच्या दिल्ली आणि गोव्यातील ज्येष्ठ नेत्यांनी काही आमदारांशी काँग्रेसची उमेदवारी घेण्याविषयी चर्चा केली आहे. बहुमतात असलेल्या भाजपला हादरा देण्यासाठी भक्कम राजकीय रणनीतीही बांधण्यास सुरुवात केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचाः पी. चिदंबरम २५, २६ ऑगस्ट रोजी गोव्यात

भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरू

भाजपमध्ये सध्या सुरू असलेले अंतर्गत मतभेद, मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडून आपल्याच पक्षाच्या मंत्री, आमदारांवर होत असलेले आरोप, काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन मंत्री झालेल्यांनी सुरू केलेली दादागिरी आणि बाबूश-जेनिफर मॉन्सेरात वगळता एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी मिळण्याबाबतची मावळलेली शक्यता आदी कारणांमुळे उत्तरेतील आमदार तथा मंत्री मायकल लोबो व मुरगाव तालुक्यातील एका आमदाराने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या या दोन आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास इतर काही ख्रिस्ती आमदारही वेगळी वाट धरू शकतात. त्याचा फटका म्हणून ख्रिस्ती मतदार भाजपपासून आणखी दुरावण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

जयेश साळगावकर यांच्यासाठी भाजपने दरवाजे उघडे ठेवले

गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्यासाठी भाजपने दरवाजे उघडे ठेवले आहेत. पण, साळगावात माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे साळगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्डसोबत युती झाली तरीही साळगावकर यांना काँग्रेसची​ उमेदवारी देण्याची अट ठेवली जाणार आहे. जयेश साळगावकर यांनीही गोवा फॉरवर्डपासून फारकत घेऊन काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास प्राधान्य देण्याचा विचार चालवला आहे.

हेही वाचाः कांदोळी येथे सापडलेल्या त्या इसमाने आत्महत्याच केली

प्रसाद गावकर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता; तर खंवटेंनी काँग्रेस उमेदवारी घ्यावी म्हणून प्रयत्न

अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी याआधीच आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये पाठवून विधानसभा निवडणूक काँग्रेसमधून लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर काँग्रेस आता पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी उमेदवारी घ्यावी म्हणून प्रयत्न करत आहे. पण खंवटे यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. २०२२ च्या निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून काँग्रेसला अधिक बळकट करण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरू झाले आहेत. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, अपक्ष, भाजपच्या काही आमदारांसोबत काँग्रेसने चर्चा सुरू केली आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणः सिद्धीच्या मृत्यूपूर्वी कुंटुंबात क्लेश, हाणामारी

फिलीप नेरी रॉड्रिग्स, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा पुन्हा काँग्रेसशी सूत जुळवण्याच्या प्रयत्नात

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले फिलीप नेरी रॉड्रिग्स, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा या आमदारांना पुढील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडून येणे कठीण वाटत असल्याने त्यांनी पुन्हा आतून काँग्रेससमवेत सूत जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण, भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना पुन्हा घेण्यास तसेच ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाशी युती करण्यास प्रदेश काँग्रेस आणि युवा काँग्रेसच्या बहुतांशी नेत्यांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. त्यामुळे फिलीप नेरी, क्लाफासियो आणि विल्फ्रेड डिसा विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः पर्रीकरांना महत्व कळलं, डॉ. सावंत का घेत नाहीत निर्णय?

गोवा फाॅरवर्डला चार ते पाच जागा!

१) गोवा फॉरवर्डसोबत युती करून त्यांना फातोर्डा, थिवीसह चार ते पाच जागा देण्याचा निर्णय तूर्त काँग्रेसने घेतला आहे. जयेश साळगावकर यांना साळगावातून, मायकल लोबोंना कळंगुटमधून, तर लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो यांना शिवोलीतून उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे.
२) गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बदललेल्या भूमिकेमुळेच राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले नाही, अशी टीका अजूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून होत आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डसोबत युती नको, यासाठी त्यांचा पहिला प्रयत्न आहे. पण युती झाली तर केवळ चार ते पाच जागा त्यांना दिल्या जातील.
३) गोवा फॉरवर्डने हा प्रस्ताव फेटाळल्यास स्बळावर निवडणूक लढवण्याचेही काँग्रेसने जवळपास निश्चित केल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | GOA FORWARD| गोवा फॉरवर्डच्या बैठकांचा धडाका सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!