करवाढ, दादागिरीमुळे मासळी महागली

इस्टर संडेला ख्रिस्ती बांधवांचा हिरमोड; हवामान बदल; मडगावातील सोपो वादाचा फटका; ३ दिवसांपासून गाड्या बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: मडगाव एसजीपीडीए घाऊक मासळी बाजारात वाढीव कर, सागरी हवामान बदल आणि सोपो कंत्राटदारांची दादागिरी, यामुळे राज्यात गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक येथून येणाऱ्या गाड्या बंद झाल्यात. उपलब्ध असलेल्या गावठी मासळीचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला जबर कात्री बसलीये. येथील मार्केटमध्ये मासळीची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने असलेल्या मासळीचे दर तिप्पट झालेत.

मासळीच्या तुटवड्यामुळे मासळी महागली

मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने असलेल्या मासळीचे दर गगनाला भिडलेत. खवय्यांना मासळी दुप्प्ट दराने खरेदी करावी लागतेय. म्हापशातील बाजारात जेमतेमच मासळी येत असल्याने मासळी विक्रेत्यांची संख्याही घटलीये. मार्केटातून ताजी व चांगली मासळी गायब झालीये. इसवण, पापलेट, सुंगटा, बांगडा यांची आवक घटल्याने उपलब्ध मासळीचे दर दुप्पट-तिप्पट झालेत. दर परवडत नसल्याने खवय्यांना सुकी मासळी, अंडी किंवा चिकन मटनावर समाधान मानावं लागतंय. मासळीचा ओघ कमी झाल्याने याच थेट परिणाम दुचाकीवरून घरोघरी फिरून मासळी विक्री करणार्‍यांवर झालाय. मासळी नसल्याने या विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केलाय.

ख्रिस्ती बांधवांचा हिरमोड

मासळीचे दर वाढल्याने रविवारी ख्रिस्ती बांधवांचा इस्टर संडेच्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचा हिरमोड झाला. ऐन सणाच्या दिवशी समस्त ख्रिस्ती बांधवांच्या खिशाला कात्री लागली. ख्रिस्ती बांधवांचे संपूर्ण महिनाभर धरलेले प्रायश्चितचे व्रत ईस्टर संडेला पूर्ण होते. यावेळी त्यांच्या घरी विविध मांसाहारी प्रकारची मेजवानी असते. मात्र, यावेळी मडगावसह राज्यातील अन्य भागातील ख्रिस्ती बांधवांवर याचा परिणाम झाला असून सर्व मत्स्य खवय्यांना मोठा फटका बसलाय.

कंत्राटदारांच्या दादागिरीमुळे मासळीची आवक बंद

मडगावचे घाऊक मासळी मार्केट हे राज्यातील मुख्य मासळी मार्केट असून राज्यात याच बाजारातून मासळी पुरवठा होतो. येथे गेल्या काही दिवसांपासून वाढीव कर आणि सोपो कंत्राटदारांची दादागिरी वाढत चालल्याने गेल्या तीन दिवसांपासून या बाजारात मासळीची आवक बंद झालीये.

हॉटेल आणि शॅकवाल्यांना फटका

वाढीव मासळी दराचा परिणाम हॉटेल तसंच शॅकवाल्यांना झाला असून त्यांच्या व्यवसायाला फटका बसलाय. हॉटेल तसंच शॅकमध्ये जेवणासाठी येणारे ग्राहक पदार्थांचे वाढीव दर फेडण्यास किरकिर करत असल्याने, व्यावसायिक वैतागलेत. नुकसान करून व्यापर करण्याची वेळ त्यांच्यावर आलीये.

म्हापसा मार्केटमधील दर

प्रकार – माप – रुपये
इसवण – किलो – १,०००
खेकडा – वाटा – ५००
पापलेट -लहान २ नग – ५००
लेपो – लहान वाटा -२००
तारले – लहान वाटा – २००
बांगडा – लहान ४ नग – २००
मोठी सुंगटे – वाटा – ५००‍
मध्यम सुंगटे – वाटा – ४००

चिकन, मटणही महागले

चिकनचे दर २३० ते २४० रुपयांच्या आसपास होते. मात्र रविवारी ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो झालेत. मटणही २०० रुपयांनी वाढले असून ११०० ते १२०० रुपये प्रतिकिलो दराने रविवारी बाजारात विकले गेले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!