गोव्याच्या मुक्तिसंग्रामाचे प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया

12 ऑक्टोबर ही डॉ. राम मनोहर लोहिया यांची पुण्यतिथी. गोव्याच्या मुक्तीसाठी पहिला सत्याग्रह मडगावात करून लोहिया यांनी पोर्तुगिजांविरोधात रणशिंग फुंकले.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पोर्तुगिजांच्या जोखडाखाली दबलेल्या आणि अनन्वित अत्याचारांनी ग्रासलेल्या गोमतंकीयांना मुक्ती मिळावी, यासाठी सत्याग्रहाचं हत्यार उपसणारे डॉ. राम मनोहर लोहिया यांची 12 ऑक्टोबर ही पुण्यतिथी. गोव्याच्या मुक्तिसंग्रामाचं स्फुल्लिंग चेतविणार्‍या या महानायकाच्या योगदानाविषयी…

इंग्रजांविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढणार्‍या नेत्यांपैकी डॉ. राम मनोहर लोहिया हे उत्तर भारतातील त्या काळातले मोठे समाजवादी नेते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला खरा, मात्र गोव्यावर पोर्तुगिजांचीच जुलमी राजवट होती. त्यांच्यापासून मुक्ती मिळावी, गोवा भारतात विलीन व्हावा, अशी तमाम गोमंतकीयांची इच्छा होती. पण उलट्या काळजाच्या जुलमी पोर्तुगिजांविरुद्ध उठाव कसा करायचा, हा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं, 1946 साली.
10 जून 1946 रोजी डॉ. राम मनोहर लोहिया गोव्यात आले. असोळणा येथील डॉक्टर ज्युलियांव मिनेझिस हे त्यांजे जिगरी दोस्त. त्यांच्या आमंत्रणावरून लोहिया गोव्यात विश्रांतीसाठी आले. ते गोव्यात आले आहेत, हे कळताच लोक त्यांना भेटायला येउ लागले. दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढू लागली. या सर्व लोकांची एकच इच्छा होती, पोर्तुगीज राजवटीतून गोव्याची मुक्तता व्हावी.

ठरलं! पोर्तुगिजांविरोधात उठाव करायचाच!
या लोकांशी संवाद साधताना लोहियांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती अशी की, लोक प्रचंड दहशतीखाली व दडपशाहीखाली दिवस ढकलत आहेत. मूलभूत मानवी अधिकार पायदळी तुडवले गेले आहेत. लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. लोकांशी संवाद साधल्यानंतर लोहियांनी ठरवलं की पोर्तुगिजांविरोधात उठाव करायचाच. मडगावात एका मैदानावर सार्वजनिक सभा घेण्याचं ठरले. दिवस ठरला 18 जून. हजारो लोक या सभेला जमले.

पोलिसांनी लोहियांना केली अटक, पण…
आझाद गोमंतक दल स्थापन करणारे अ‍ॅडव्होकेट विश्वनाथ लवंदे व इतर स्वातंत्र्य सैनिक तिथं होते. डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस एका उघड्या घोडागाडीतून मडगावातील त्या मैदानावर पोहोचले. लोकांनी जल्लोष केला. डॉक्टर राम मनोहर लोहिया आपल्या भाषणाला सुरुवात करणार एवढ्यात पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अडवलं. भाषण करण्यापासून रोखलं व गाडीत डांबून नेलं. लोहिया आपलं भाषण वाचू शकले नाहीत, पण त्या ऐतिहासिक भाषणाची प्रत त्यांनी विश्वनाथ लवंदे यांच्या हातात दिली. त्यानंतर ते पोलिसांसोबत गेले. लवंदे यांनी जमलेल्या हजारो लोकांसमोर ते भाषण वाचलं.

डॉक्टर लोहियांना अटक करून मडगाव पोलीस स्टेशनवर नेण्यात आलं. पण लोकांचा संताप पाहून पोलिसांनी लोहियांना पणजीला नेलं. पण लोहिया हे गोमंतकीय किंवा पोर्तुगीज नागरिक नव्हते, त्यामुळं कायद्याप्रमाणं त्यांना शिक्षा करता येणार नाही, ही कायदेशीर बाजू पोलिसांच्या लक्षात आली. ते भारतीय नागरिक असल्यामुळं त्यांना नेउन गोव्याच्या सीमेवर सोडण्यात आलं.

नंतर सुरू झाला उघड संघर्ष…
डॉ. लोहियांच्या अटकेनंतर गोमंतकीय नागरिक पेटून उठले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होउ लागला. आपली मते व्यक्त करण्याचाही आम्हाला अधिकार नाही, हे पाहून गोमंतकीय त्यावेळी आणखी पेटून उठले. 18 जून 1964 नंतर गोव्यात सत्याग्रह चळवळीला वेग आला. हा चळवळीचा वणवा उत्तरोत्तर भडकत गेला आणि पोर्तुगिजांच्या पलायनानंतरच थांबला. हा मुक्तीसंग्रामाचा यज्ञ धगधगण्यासाठी पहिली समीधा टाकली ती डॉ. राम मनोहर लोहियांनी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!