८९,३८४ जणांना तालांव; ५.३१ कोटींचा दंड वसूल!

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी पोलिसांची दोन महिन्यांतील कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : यंदाच्या वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी ८९,३८४ जणांना तालांव देऊन त्यांच्याकडून सुमारे ५.३१ कोटींचा दंड वसूल केला आहे. उत्तर गोवा वाहतूक पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ही माहिती दिली.

यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. बेशिस्त चालकांमुळे वाढल्याने अपघात आणि त्यातील बळींची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, वाहतूक पोलीस विभागाने राज्यभरातील गस्त वाढवून कारवाई मोहीम सुरू केली. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या अवघ्या दोन महिन्यांत राज्यभरातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८९,३८४ जणांविरोधात कारवाई करत त्यांना तालांव दिला आहे. त्यांच्याकडून ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला, असे शिरोडकर ‘गोवन वार्ता’शी बोलताना म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी या दोन महिन्यांत सर्वाधिक गुन्हे बेशिस्त पार्किंगबाबत दाखल करून संबंधितांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर दारू पिऊन वाहने हाकणे, दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान न करणे, चारचाकी चालवताना सीटबेल्ट न लावणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, भरधाव वेगाने वाहने हाकणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे आदी गुन्ह्यांखालीही दंड वसूल करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

कामगिरी अशी

विभाग                                  गुन्हे नोंद                 दंड जमा
  • १६ ट्रफिक सेल                     ६७,४९४                 ४,०८,४६,५००
  • उत्तर गोवा                            १०,९४४                     ६१,६४,५००
    (१३ पोलीस स्थानके)
  • दक्षिण गोवा                           १०,९४६                     ६१,६०,०००
    (१३ पोलीस स्थानके)

मोहिमांमुळे अनेकांना दणका

दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे आदींसारख्या प्रमुख कारणांमुळे राज्यातील अपघातांत वाढ होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर दिवसा आणि रात्रीही गस्त घालण्यात येत आहे. सुधारित मोटारवाहन कायद्यानुसार दंड वसूल केला जात असल्याने वाहतूक नियम उल्लंघनाचे प्रमाण कमी झालेले आहे, असे सिद्धांत शिरोडकर म्हणाले. यापुढे अशा मोहिमा वारंवार सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले.

असे नोंदवले गुन्हे

भरधाव वेगाने वाहने हाकणे                          २,०९४
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे                          ६,८०४
काळ्या काचा                                            ९,७१९
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे               १,१२९
दारू पिऊन वाहन चालवणे                             २९८
सीटबेल्ट न लावणे                                       १,९२८
अल्पवयीन                                                       ६

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!