कामगारांची आर्थिक फसवणूक; कंत्राटदारावर गुन्हा

कंत्राटदाराकडून कामगारांचा भविष्यनिधी तसंच इतर निधी मिळून १२,०१,२८५ रुपयांची फसवणूक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: वास्को येथील दक्षिण पश्चिम रेल्वे गार्ड आणि लोको पायलटांसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करणार्‍या कंत्राटदार एम. के. बेलावाडी यांनी कामगारांचा भविष्यनिधी तसेच इतर निधी मिळून १२,०१,२८५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने गुन्हा दाखल केला आहे.      

प्रकरण काय?

या प्रकरणी तक्रार आल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली. त्यानुसार, हुबळी येथील एम. के. बेलावाडी या कंत्राटदाराला वास्को येथील दक्षिण पश्चिम रेल्वे गार्ड आणि लोको पायलटांसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करणासाठी दि. १ मार्च २०१८ रोजी १ कोटी ८८ लाख ८१ हजार ०५५ रुपयांचे दक्षिण पश्चिम रेल्वेने कंत्राट दिले होते. यासाठी रेल्वेने कंत्राटदाराला अकुशल कामगारांचे वेतन प्रत्येकी १२,६०२ रुपये, तर कुशल कामगाराचे वेतन प्रत्येकी १६,४९० दिले होते. असे असताना कंत्राटदाराने अकुशल कामगाराना ६,००० रुपये तर कुशल कामगारांना ९ हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, कंत्राटदाराने रेल्वेकडून घेताना ती रक्कम कंत्राटाप्रमाणे घेतली. यासाठी त्याने संबंधित कामगारांचे बँक खात्याचे एटीएम कार्ड वापरून खात्यात जमा होणारे वेतनाचे पैसे काढल्याचे समोर आले आहे.

या व्यतिरिक्त कंत्राटदाराने कामगारांचे भविष्यनिधी तसेच राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ईएसआय) पैसे जमा न करता बनावट दस्तऐवज तयार करून संबंधित रक्कम रेल्वेकडून घेतल्याचे समोर आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!