कमावत्या व्यक्तीचं कोविडने निधन झाल्यास 2 लाखांची आर्थिक मदत

गोवा घटक राज्य दिनाच्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः गोवा घटक राज्य दिनाच्या निमित्ताने रविवारी 30 मे रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने राज्यातील तसंच गोव्याबाहेर राहणाऱ्या गोंयकारांना शुभेच्छा आणि संदेश दिला. यावेळी कोविड-19 महामारीत जीव गावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीये.

हेही वाचाः MODI GOVT | मोदी सरकारच्या सत्तेची सात वर्षं पूर्ण

2 लाखांची आर्थिक मदत

सध्या राज्यात कोविड महामारीने धुमाकूळ घातलाय. या महामारीने अनेक गोंयकारांचा प्राण घेतलाय. अनेक कुटुंब या महामारीत उध्वस्त झालीयेत. तर अनेक मुलांच्या डोक्यावरून आईवडिलांचं छत्र नाहीसं झालंय. कोविड महामारीमुळे घरातील कमावत्या व्यक्तीचं निधन झालेल्या त्याचप्रमाणे आर्थीकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना सरकारने 2 लाखांची आर्थिक मदत देणार असल्याचं जाहीर केलंय. रविवारी गोवा घटक राज्य दिनाच्या निमित्ताने गोंयकारांना दिलेल्या व्हर्च्युअल संदेशात मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केलीये. याबाबत सरकाराचा अधिकृत आदेश लवकरच निघेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचाः ‘हॉटेल लसीकरण पॅकेज’वर कारवाई करण्याचा आदेश !

मुख्यमंत्री अनाथ आधार योजना, अनाथांना मोफत लॅपटॉप

मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनाथ आधार योजनेचीही घोषणा केली. या योजनेंतर्गत फक्त कोविडमुळेच अनाथ झालेल्या मुलांना नाही, तर इतरही अनाथ मुलांना दर महिन्याला आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे. चाईल्ड केअर इन्सिट्यूट्सना आता मुलांच्या 21 वर्षांपर्यंत सरकारकडून मदत मिळणार आहे. आधी ही मर्यादा 18 वर्षं होती. त्याप्रमाणे जी अनाथ मुलं 10वी आणि त्यापुढील शिक्षण घेत आहेत त्यांना सरकारतर्फे मोफत लॅपटॉप दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.

हेही वाचाः सुवर्ण गोव्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया

18-44 वयोगटासाठी लसीकरण 3 जूनपासून सुरू

राज्यात सध्या धुमाकूळ घालणारी कोविड महामारी भयंकर आहे. यातून सहीसलामत बाहेर पडायचं असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. त्यामुळे सरकार टीका उत्सव मोठ्या प्रमाणात राबवत असल्याचंही ते म्हणाले. 45 वर्षं आणि वरील वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य सरकार आणि आरोग्य विभागाने समोर ठेवलं असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे 3 जून पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 3 जून पासून सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत सर्वप्रथम 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांना, को-मॉर्बिड आजार असलेल्यांना, दिव्यांग व्यक्तींना तसंच वाहतूक खात्याने सुचवल्याप्रमाणे रिक्षा चालक, नोंदणीकृत मोटारसायकल पायलट, टॅक्सी ड्रायव्हर आणि दर्यावर्दीच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांचे उत्तम वित्तव्यवस्थापन

कोविडनंतर स्वयंपूर्ण गोवा मोहिम पुन्हा सुरू

राज्यात मोठ्या प्रमाणात साधनसुविधा विकास झाला आहे. आता गरज आहे ती माणसाचा विकास होणं. त्यासाठी सरकारनं स्वयंपूर्ण गोवा योजना जाहीर केलीय. कोविडमुळे या मोहिमेत थोडा खंड पडला आहे. मात्र येणाऱ्या काळात ही योजना सरकार पंचायत, पालिका पातळींवर मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE |देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट; कोरोनाबळीही कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं यांनी यशस्वीरित्या पंतप्रधानपदाची 7 वर्षं पूर्ण केल्याबद्दल त्यांना समस्त गोंयकारांकडून शुभेच्छा दिल्या. लोकांची आणि देशाची सेवा करण्याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोंदींचं समर्पण आणि त्यांची बांधिलकी प्रेरणादायी असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यातील लोकांसाठी आणि राज्यासाठी पंतप्रधानांनी राबवलेल्या विविध योजाना, तसंच कोविड काळात केलेल्या घोषित केलेल्या योजनांबद्दल त्यांचे आभारही मानले.

हेही वाचाः गोवा विद्यापीठाचे ऑनलाइन वर्ग 7 जूनपर्यंत रद्द

70 टक्के लोकांना मदत

16 मे रोजी राज्यात येऊन धडकलेलं तौक्ते वादळ हे भयानक होतं. या वादळाने अनेकांचं मोठं नुकसान केलं. या वादळात जीवितहानी झालेल्यांना सरकारने 4 लाखांची मदत केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे लोकांचं झालेलं नुकसान लक्षात घेता तातडीने 70 टक्के लोकांना आत्तापर्यंत नुकसान भरपाई दिली असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या वादळात आपत्ती व्यवस्थापनाने केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचाः जीएसटी काऊन्सिलची 43वी बैठक संपन्न

30 मे 1987 रोजी मिळाला गोव्याला राज्याचा दर्जा

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथं छोटं राज्य आहे. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्यानं 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवलं आणि लवकरच हा प्रदेश काबीज केला. 1961 मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे 450 वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!