FRAUD | अखेर ती महिला ठकसेन गजाआड

हरवळेतील प्रकार; सरकारी नोकरीचं आमिष दाखवून ९५ हजार उकळले; दीपश्री विरोधात फसवणुकीती अनेक प्रकरणं

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई: सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसा उकळणाऱ्या हरवळे (साखळी) येथील दीपश्री सावंत उर्फ दीपश्री वासू गावस हिला वाळपई पोलिसांनी अटक केली. सध्या तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलंय. या प्रकरणात मोठी टोळी गुंतल्याचा संशय असल्यानं पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी दिली.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून ९५ हजार उकळले

संशयित दीपश्रीने अडवई-सत्तरी येथील देसाईवाडा या ठिकाणी राहणारे राजाराम देसाई यांच्याकडून गोवा सरकारच्या जलस्रोत खात्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून ९५ हजारांची रक्कम उकळल्याची तक्रार पोलिसांत दाखल झालीये. जवळपास सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण घडलं. देसाई हे जलस्रोत खात्यामध्ये पंप ऑपरेटर म्हणून काम करतात. पैसे दिल्यानंतर नोकरीचं पत्र देण्यासंदर्भात देसाई यांनी महिलेकडे तगादा लावला असता त्यांनी नोकरीचं खोटं पत्र तयार करून देसाईंना दिलं. हे पत्र घेऊन देसाई म्हापसा येथील आझिलो इस्पितळात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नोकरीत रुजू होण्यासाठी गेले असता ते खोटं असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर त्यांनी दीपश्रीकडे पैशांची मागणी केली. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी देसाई यांनी वाळपई पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली.

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

याबाबत पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्वेश गड्डी यांनी रीतसर तपास केल्यानंतर दीपश्री सावंत हिच्यावर गुन्हा दाखल केला व तिला अटक केली. वाळपईच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. नंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीये. संशयित महिलेने देसाई यांच्याकडून पैसे घेतल्याचे मान्य केलंय. ती गोवा सरकारच्या भू सर्वेक्षण खात्यात काम करीत असल्याचं सांगत आहे, असं पोलिसांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!