.. अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण पुढील निर्णय घेऊ : येडियुरप्पा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत.

पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.

बीएस येडियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येडियुरप्पा म्हणाले.

बेंगळुरू येथील कर्नाटक विधान सौधा येथे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान भावूक झाले होते. ज्यावेळी कोणतीही गाडी नव्हती तेव्हा शिमोगा, शिकारीपुरा येथे काहीच कार्यकर्ते नसताना पक्ष उभा करण्यासाठी आम्ही सायकल चालवत जात असल्याची आठवण त्यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा भाजपा सत्तेवर यावी ही माझी इच्छा आहे.” असे येडियुरप्पा म्हणाले.

दरम्यान, येडियुरप्पा यांनी चांगले काम केले आहे, असे स्पष्ट करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटक भाजपामधील अंतर्गत कलहाच्या चर्चेबाबत सारवासारव केली होती. मात्र, केंद्रीय संसदीय कामकाज आणि खनिकर्ममंत्री प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर कर्नाटकचे मंत्री मुरुगेश निरानी यांना भाजपाश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याबाबत दिल्लीत चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!