बाप रे ! पीएमओला फसवणं इतकं सोपं ?

पीडब्लूडी अभियंतांकडून खोटी माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या हायवे – 66 चे निकृष्ट काम, धोकादायक खड्डे, दिशादर्शक फलकांअभावी वाहनचालकांची तारांबळ आणि एकूणच हा हायवे मृत्यूचा सापळा बनल्याचा अनुभव येथून प्रवास करणारे लोक रोज घेताहेत. या हायवेचा कंत्राटदार मेसर्स एमव्हीआर इन्फ्रा कंपनीचा भाजपला मोठा जिव्हाळा आहे. मुख्यंमत्री, पीडब्लूडीमंत्री किंवा कुणीच या कंत्राटदाराबाबत चकार शब्द काढत नाही. आता ह्याच कंत्राटदाराला सांभाळण्यासाठी पीडब्लूडी खात्याच्या अभियंत्यांनी चक्क आपली नोकरीच पणाला लावलीए. या हायवेच्या निकृष्ट कामासंबंधी पीएमओकडे दाखल झालेल्या तक्रारीवर स्पष्टकरण देताना चक्क खोटी माहिती देण्यात आलीए. या खोट्या माहितीची पीएमओ कार्यालय दखल घेईल की भाजपच्या या लाडक्या कंत्राटदाराला पीएमओ कार्यालयाकडूनही अभय मिळेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

लाडका कंत्राटदार

गोव्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून मेसर्स एमव्हीआर इन्फ्रा व त्यांच्या संलग्न कंपनीची चांदी सुरू आहे. बहुतांश बडी पायाभूत विकासाची कामे या कंत्राटदारालाच मिळतात. दिल्लीतील एका बड्या भाजपच्या ज्येष्ट नेत्याचा हा कंत्राटदार नात्यातला आहे. या कंत्राटदाराच्या इशाऱ्यावर प्रशासन आणि सरकारही नाचत असल्याचा अनुभव अनेक अधिकाऱ्यांनी घेतलाय. चक्क, कंत्राटदाराची बीलं थकल्यास दिल्लीतून फोन घणाणतात आणि इथले अधिकारी, भाजपचे नेते, पदाधिकारी पळापळ करतात,अशी परिस्थिती बनली आहे. या कंत्राटदाराच्या मुजोरीला अजिबात पारावार राहीलेला नाही. कुणीही त्याला जाब विचारत नाही. लोकांना रस्त्यांवर मारून टाकलं जात असलं तरीही कुणी ब्र काढत नाही. मुख्यमंत्र्यांनाच जुमानत नसलेला हा कंत्राटदार सुपरपॉवर बनल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गडकरींचेही काहीच चालेना

केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी देशात ठिकठिकाणी महामार्गांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना दर्जा सांभाळण्याचा इशारा दिलाए. दर्जाकडे तडजोड केल्यास जेसीबीखाली टाकीन,असंही ते रागाने म्हणालेत. एमव्हीआरच्या दर्जाहीन कामं तसेच इथल्या निकृष्ट कामाचे अनेक दाखले गडकरींना देऊनही त्याचा काहीच फायदा झालेला नाही. एमव्हीआरबाबत खुद्द नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचंही काहीच चालत नाही, यावरून या कंत्राटदाराला गॉडफादर किती शक्तीशाली आहे, हेच अधोरेखीत होतं.

नारायणानंतर आता आत्मारामाची पाळी

हायवे क्रमांक- 66 च्या कामातील हलगर्जीपणाबाबत पीएमओकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून मागीतलेल्या स्पष्टीकरणावेळी यापूर्वी कार्यकारी अभियंते नारायण मयेकर यांनी खोटी माहिती दिली होती. आता नारायण मयेकर हे सेवा निवृत्त झाल्यानंतर हा ताबा आत्माराम गावडे यांच्याकडे आलाए. आता आत्माराम गावडे यांनीही पीएमओ कार्यालयाला दिलेली माहिती खोटी आहे,असा दावा तक्रारदारांनी केलाए. नियमीत रस्त्याच्या डागडुजी, खड्डे बुजविण्याचं नियमीत काम, पावसामुळे खड्डे पडत असल्याचा दावा ही सगळी कारणं केवळ वेळकाढूरपणाची आहेत,अशी नाराजी तक्रारदारांनी केलीए. मुळातच या कंत्राटदाराला रान मोकळे ठेवले आहे. त्याने लोकांचे बिनधास्त जीव घ्यावेत आणि त्याला कुणीही विचारणार नाही,अशा तोऱ्यात हा कंत्राटदार वावरत असल्याची टीका स्थानिकांनी केलीए. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या खोट्या माहितीची कल्पना पीएमओ कार्यालयाला दिली जाईल,असंही तक्रारदारांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!