मोपा विमानतळामुळे शेतकरी देशोधडीला

मातीचा भराव वाहून आल्याने शेतीचे नुकसान

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पेडणेः गोव्यातील पेडणे तालुक्यातल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने इथला शेतकरी देशोधडीलाच लागला आहे. विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने हिरावून घेतल्या हे कमी म्हणून की काय आता राहीलेल्या जमिनीतील शेतीचे उत्पादनही विमानतळामुळे नष्ट होण्याचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसामुळे विमानतळ प्रकल्पाठिकाणची माती सगळीकडून गावांत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. उगवे येथे या मातीमुळे शेतकरी हवालदिल झालेत.

जीएमआर कंपनीची ही निव्वळ बेपर्वाई

मोपा येथे पठारावर विमानतळाचे काम जोरात सुरू आहे. तिथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलंय. मातीचे ढीग साठवण्यात आलेत. या मातीला कोणतेही सरंक्षण नसल्यानं चक्रीवादळाच्या पावसात ही माती सगळ्या बाजूंनी वेगवेगळ्या गावांत वाहून गेली आहे. विशेष म्हणजे या मातीच्या प्रवाहाबरोबर मोठ मोठे दगडही वाहून आलेत. सुदैवाने ही माती पारंपरिक ओहळातून वाहून आल्याने तो प्रवाह लोकवस्तीत शिरला नाही अन्यथा स्थानिकांच्या घरांचे मोठं नुकसान झालं असतं. मोपा विमानतळाचं काम करणाऱ्या जीएमआर कंपनीची ही निव्वळ बेपर्वाई आहे, अशी टीका मोपा- उगवेचे उपसरपंच सुबोध महाले यांनी केली. महाले यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसंच या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेत.

उगवे गावावर चौफेर संकट

उगवे या गावावर चौफेर बाजूंनी संकट ओढवलंय. एकीकडे बेसुमार रेती उपशामुळे उगवेतील शेतकऱ्यांची शेती, बागायती नदीत कोसळून जात आहे. तिलारी कालव्यांच्या कामामुळे येथील लोकांच्या बाजू बागायतींचं नुकसान झालंय. याठिकाणी जलस्त्रोत खात्याने कालव्याऐवजी तिथे भली मोठी लोखंडी पाईपलाईन घातल्याने त्यामुळे डोंगरावरील माती वाहून ती शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता यातून बाहेर पडून पुन्हा शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना मोपा विमानतळाची माती वाहून आल्यानं दुसरा फटका बसलाय. पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी लोकांना भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी हे आश्वासन वास्तव्यात खरं ठरतं की केवळ शब्दांची सहानुभूती ठरतं हे लवकरच कळणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!