केंद्र सरकार शेतकरीविरोधी; कृषी कायदे मागे घ्या !

राजभवनावर मोर्चाद्वारे काँग्रेसची मागणी. ऑक्टोबरपासून कायद्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवणार. त्यानंतर शेतकरी संमेलन.

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सोमवारी सायंकाळी काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या घोषणा मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी दिल्या. राजभवनच्या दरवाजाजवळ हा मोर्चा अडवण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी राज्यपालांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले.

संसदेत नुकत्याच संमत झालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असली तरी हे कायदे मागे घ्यावेत, अशी काँग्रेसची मागणी कायम आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सहभागी कार्यकर्त्यांनी हातात केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणांचे फलक होते. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाही दिल्या. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, हे आंदोलन सुरूच राहील. 2 ऑक्टोबरपासून कायद्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर शेतकरी संमेलन घेण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न : गिरीश चोडणकर
भाजप सरकारने लोकशाही बळकट करणार्‍या संस्था नष्ट केल्या. आता शेतकर्‍यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेत गैरमार्गाने शेतीविषयीची विधेयके संमत झाली आहेत. विरोधकांनी मतविभागणीची मागणी केली होती. ही मागणी सरकारने फेटाळली. या कायद्यामुळे शेतकर्‍यांकडे जमिनी राहणार नाहीत. शेतकरी कंत्राटी कामगार होतील. शेतकर्‍यांना जमिनी विकण्याची वेळ येईल. त्यांच्या जमिनी धनदांडग्या कंपन्यांच्या ताब्यात जाव्यात, यासाठीच हे कायदे संमत करण्यात आले आहेत, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

संसदेत मंजूर करण्यात आलेली कृषी विधेयके शेतकरीविरोधी आहेत. शेतकर्‍यांचे नुकसान करणार्‍या या कायद्यांना काँग्रेसचा विरोध आहे. पक्ष नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी राहील. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला हे कायदे मागे घेण्याचा सल्ला द्यावा.
– दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

करोनापासून दूर राहण्यासाठी आमदार अनुपस्थित
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशिवाय एकही आमदार या मोर्चात सहभागी झाला नव्हता. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होण्याची सक्ती पक्षाने केलेली नव्हती. करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आमदार अनुपस्थित राहिले, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. आमदार प्रतापसिंग राणे (Pratapsing Rane) आणि आलेक्स रेजिनाल्ड (alex reginald lawrence) यांनी आपण शेतकर्‍यांसोबत असल्याचे सांगितले आहे.

आंदोलनावर तानावडेंची सडकून टीका
काँग्रेसने सोमवारी काढलेल्या मोर्चात शेतकरी कमी आणि इतर ओढून आणलेल्यांचीच संख्या जास्त होती. शिवाय दिगंबर कामत वगळता इतर आमदार उपस्थित नव्हते. अभ्यास न करता विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस अशा प्रकारचे मार्चे काढत आहे. 70 वर्षांत शेतकर्‍यांना लुबाडण्यासाठी नेमलेल्या दलालांची अडचण होणार म्हणूनच काँग्रेस विरोध करत आहे. जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!