अपयश लपविण्यासाठी खोटारडेपणा : म्हांबरे

भाजपच्या बनावट प्रचाराचा पर्दाफाश केल्याचा आम आदमी पक्षाचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजप आठ वर्षांपासून सत्तेत आहे. बेरोजगारी ही भाजपचीच निर्मिती आहे. चार वर्षे मुख्यमंत्रिपदावर असलले डॉ. प्रमोद सावंत आताच का खाणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत? पाणी मोफत देऊ शकतो हे आताच कसे लक्षात आले? अपयश लपवण्यासाठी भाजपकडून खोटारडेपणा केला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्व लाभार्थ्यांना मदत मिळाली का?

म्हांबरे पुढे म्हणाले की, सरकारच्या दाव्याप्रमाणे सरकारने राज्यातील कोविड बाधितांना ५००० रुपये दिले आहेत. ते सर्व लाभार्थ्यांना मिळाले आहेत का? किती लोकांना ही मदत मिळाली याची यादी सरकार देऊ शकते का ? कोविडबळी झालेल्या कुुटुंबीयांना मृत्यूच्या दाखल्यासाठी सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. लाडली लक्ष्मी, गृहआधारसह सर्व योजनांचे पैसे अनेकांना मिळालेले नाहीत. ही खोटी आश्वासने नाहीत का, असा सवालही त्यांनी विचारला.

दिल्लीत कोणालाही आमदारांसमोर हात पसरावे लागत नाहीत

दिल्ली सरकारच्या आदर्श व्यवस्थेचे उदाहरण देताना म्हांबरे म्हणाले की, दिल्लीत सरकारने जाहीर केलेली प्रत्येक योजना लाभार्थ्यांना मिळत आहे ना, याची खात्री केली जाते. कोणालाही आमदारांसमोर हात पसरावे लागत नाहीत. योजनांचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी, हेच दिल्ली सरकारचे यशाचे गमक आहे, असे कॅप्टन हिएगास म्हणाले.

सावंत सरकारचा गोंयकारांसाठी ८० टक्के नोकऱ्या राखीव असल्याचा दावा फोल

सावंत सरकारचा गोंयकारांसाठी ८० टक्के नोकऱ्या राखीव असल्याचा दावाही असाच फोल आहे. नोकऱ्या खरोखरच राखीव असत्या तर आज अशी परिस्थिती नसती. दिल्लीत कोविड काळात एका वर्षात रोजगार पोर्टलद्वारे सुमारे १० लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. भाजप अशी आकडेवारी देऊ शकेल का, असा प्रश्नही म्हांबरे यांनी विचारला. एका वर्षात आम्ही दहा लाख नोकऱ्या निर्माण करू शकतो. त्यामुळे कल्पना करू शकता की, आम्ही गोव्यात काय करू शकतो, असे पक्षाचे गोवा उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!