न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; संगीत पार्ट्यांचा धिंगाणा सुरूच!

न्यायालयाच्या आदेशाला किनारी भागांत ठेंगा; पोलिसांकडूनही कानाडोळा, स्थानिकांत संताप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात रात्री १० नंतर खुल्या जागेत पार्ट्या आयोजित करून ध्वनिप्रदूषण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पूर्णपणे बंदी घातली आहे. परंतु, किनारी भागांतील अनेक पार्ट्या आयोजकांनी न्यायालयाच्या या आदेशाला ठेंगा दाखवला आहे. रात्री १० नंतरही कर्णकर्कश संगीत लावून पार्ट्या सुरू असल्याचे चित्र किनारी भागांतील अनेक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे.
हेही वाचाःRain Update | राज्यात ‘या’ तारखेपासून पावसाचं पुन्हा धुमाशान…

न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

राज्यात रात्री १० नंतर खुल्या जागेत पार्ट्या आयोजित करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ३० नोव्हेंबर रोजी दिले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्या सुनावणीवेळी दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईचा अहवालही सादर करण्यास सांगितलेले होते. न्यायालयाच्या या आदेशामुळे किनारी भागांत रात्रभर चालणाऱ्या संगीत पार्ट्यांवर आळा बसेल असे तेथील स्थानिकांना वाटले होते. परंतु, न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत आयोजकांनी पार्ट्या सुरूच ठेवलेल्या आहेत. त्यासंदर्भातील तक्रारी स्थानिक पोलिसांकडे करीत आहेत. पण, पोलिसांकडूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचाःMopa Airport | मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव!

पार्ट्या आयोजकांनाही कोणतेही भय राहिलेले नाही

पर्यटन हंगामात राज्यातील किनारी भागांत रात्रभर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खुल्या जागेतील पार्ट्यांमध्ये कर्णकर्कश संगीताचा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊन त्याचा फटका स्थानिक जनतेलाही सहन करावा लागतो. त्यामुळे रात्री १० नंतर अशा प्रकारच्या पार्ट्यांना परवानगी देण्यात येऊ नये. परवानगी नसतानाही अशा पार्ट्या आयोजित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने चार दिवसांपूर्वीच पोलिसांना दिलेले होते. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही किनारी भागांतील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अनेक हॉटेल्स, बार रात्रीच्यावेळी अशा पार्ट्या आयोजित करीत आहेत. याची माहिती असूनही स्थानिक पोलिसांकडून त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. अशा पार्ट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना ध्वनी तपासणी यंत्रेही देण्यात आलेली आहेत. परंतु, ही यंत्रे स्वतःकडेच ठेवून पोलीसही सुस्त बसून आहेत. त्यामुळेच पार्ट्या आयोजकांनाही कोणतेही भय राहिलेले नाही. त्याचा परिणाम किनारी भागांतील नागरिकांवर होत आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहेत.
हेही वाचाःपेडणेतील किनारी भागात पंधरा वर्षांनंतर मिळाली शांत झोप…

पर्यटनमंत्र्यांनीही व्यक्त केली होती नाराजी

किनारी भागांतील पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच न्यायालयाचे आदेश डावलून तेथे रात्री १० नंतरही खुल्या जागेत पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचे खुद्द पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही शुक्रवारी मान्य केलेले होते. पोलीस आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत. पण, खापर मात्र पर्यटन खात्यावर फोडले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
हेही वाचाःGoa Crime | रिसॉर्टमधील रूमबॉयनीच केला रशियन तरुणीवर बलात्कार…

पार्ट्यांची बुकिंगही अगोदरच!

राज्यात सध्या पर्यटन हंगाम असल्याने देश-विदेशांतील लाखो पर्यटक गोव्यात दाखल झालेले आहेत. त्यातील अनेक पर्यटकांनी हॉटेल्ससह रात्रीच्या पार्ट्यांचेही अगोदरच बुकिंग केलेले आहे. असे पर्यटक हळूहळू येत असल्याने त्यांच्यासाठी पार्ट्या आयोजित करणे संबंधित व्यवस्थापनांना बंधनकारक होत आहे. त्यातून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. पण, पोलिसांचे​ भय नसल्याने त्यांच्याकडून रात्रभर पार्ट्या चालवल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
हेही वाचाःमांद्रे किनाऱ्यावरील नाईट क्लब व्यावसायिकांचे धाबे दणाणले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!