CASINO | सोळाव्यांदा मुदतवाढ! कॅसिनो आणखी सहा महिने मांडवीतच

स्थलांतराचा विचार नाहीच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांना राज्य सरकारने बुधवारी सोळाव्यांदा मुदतवाढ दिली. ऑगस्ट २०१३ मध्ये तत्कालीन पर्रीकर सरकारने कॅसिनो जहाजांना प्रथम सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सहा-सहा महिन्यांनी सरकारकडून कॅसिनो जहाजांना मुदतवाढ मिळत आहे.

हेही वाचाः बदल्यांचं सत्र सुरुच! 43 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अजून पर्यायी जागा नाही म्हणून….

मांडवीतील कॅसिनोंसाठी अजून पर्यायी जागा निश्चित झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकार कॅसिनो जहाजांना आहे तेथेच ठेवण्यासाठी मुदतवाढ देत आहे. जहाजे इतर ठिकाणी हलविण्याचा सध्यातरी विचार नाही. त्यामुळे यावेळीही पुढील सहा महिन्यांसाठी जहाजांना मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

सरकारकडून आश्वासनांचा खेळ

सप्टेंबर २०२० मध्ये देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदतवाढ ३१ मार्च रोजी संपते. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने पुढील सप्टेंबरपर्यंत कॅसिनो जहाजे मांडवीतच राहणार आहेत. मांडवीतील कॅसिनोंना अन्यत्र हलविले जाईल, असे आश्वासन सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे. पण दुसऱ्या बाजूने कॅसिनोंना मांडवीत राहण्यास मुदतवाढही देत आहे. कॅसिनोंचे स्थलांतर करण्यासाठी मध्यंतरी गृह खाते व बंदर कप्तान खात्याने मिळून चार जागांची पाहणी केली होती. मांडवी नदीच्या मुखावर आग्वाद तुरुंगाच्या जवळ, झुआरी नदीत पुलाच्या पूर्वेस व पश्चिमेच्या बाजूने तसेच शापोरा नदीतील ठिकाण अशा चार जागा सरकारने विचारात घेतल्या होत्या. यांपैकी एका ठिकाणी कॅसिनो नेण्याचा विचारही सरकारने चालवला होता. पण नंतर त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

हेही वाचाः कॅसिनोंना पणजी महापालिकेचा रेड सिग्नल

स्थलांतराचा विचार नाहीच

दरम्यान, मोपा येथे गेमिंग झोन तयार करून तेथे कॅसिनो स्थलांतरित करण्याचा विचार सरकार करत होते. पण तसा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. मांडवी नदीतच दुसऱ्या ठिकाणी कॅसिनो नेण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील लेखी उत्तरातून दिली होती.

हेही वाचाः महत्त्वाच्या 25 बातम्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!