कोविड रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई कधी देणार ते स्पष्ट करा

काँग्रेस प्रवक्ते तुलीयो डिसोझा यांचा सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यातील कोविड रुग्णांच्या मृत्युंसाठी पूर्णपणे जबाबदार असलेले भाजप सरकार आज निर्लज्जपणे केवळ दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मृतांच्या कुटुंबियांकडे देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन प्रसिद्धी मिळवीण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्यात डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोविड रुग्णांची हत्याच केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते तुलीयो डिसोझा यांनी केला आहे. भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाने कोविडचे मृत्यु झालेल्या कुटुंबियांसाठी नुकसान भरपाई कधी देणार यावर स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी डिसोझा यांनी केली आहे.

काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबी बागकर, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सचिव अर्चित नाईक, साईश आरोसकर, दत्ताराम पेडणेकर आणि नगरसेवक ज्योएल आंद्राद हजर होते.

गोव्यात आजपर्यंत ३२९९ जणांचा कोविडने मृत्यू

गोव्यात आजपर्यंत ३२९९ जणांचा कोविडने मृत्यू झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सुमारे ४०० रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले. सरकारने मृत्यूची नोंदणी करण्यातही घोळ घातल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भाडज सरकार कोविड मृतांच्या कुटुंबियांप्रति असंवेदनशील

सरकार आज कोविडची केवळ दोन लाखांची सानुग्रह रक्कम देतानाचे फोटो काढून प्रसिद्धी घेते. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना दाखवण्याचं भान सरकारला राहिलेलं नाही. ‘आपदा मे अवसर’चं धोरण राबवणारं भाजप सरकार लोकांच्या दु:खाचाही बाजार मांडत आहे हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल जनतेची माफी मागावी, अशी मागणी डिसोझा यांनी केलीये. आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करुन सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस सरकार कोविड रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकासाठी आणि खास करुन ज्या मुलांचे दोन्ही पालक कोविडात दगावले यांच्यासाठी नोकरी उपलब्ध करुन देणार आहे, अशी घोषणा डिसोझा यांनी केली.

भाजपने गोव्यात ‘आजाराचा बाजार’ केला

भाजपने गोव्यात ‘आजाराचा बाजार’ केला. टीका उत्सवाला राजकीय रंग देत भाजप कार्यकर्त्यांनी आपली प्रसिद्धी करुन घेतली. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची भाजप मंत्री-आमदारांनी साठवणूक केली. आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर करण्याचे सांगुन २२.५० कोटींचा घोटाळा केला, असं डिसोजा म्हणाले.

काँग्रेस पक्ष आता तळागाळात मजबूत होत आहे

काँग्रेस पक्ष आता तळागाळात मजबूत होत आहे आणि त्यामुळेच काही उपद्रवी अपशकुन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण युवा आणि निष्ठावान कार्यकर्ते अशा उपद्रवीयांच्या कारवाया कदापी यशस्वी होऊ देणार नाहीत, असं बाबी बागकर म्हणाले.

पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील

आमदार लुईझीन फालेरो यांचा पक्षात मान राखला जात नाही का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डिसोजा यांनी सांगितलं, लुईझीन फालेरो यांनी पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री तसंच अखिल भारतीय समितीचे महासचिव म्हणून कार्यभार सांभाळला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांची निवडणुक संयोजन समितीवर नेमणुक केली आहे. स्वता लुईझन फालेरो यांनीच आपली काँग्रेस पक्षात मानहानी न झाल्याचं प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं आहे. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असं डिसोझा यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!