Exclusive | चिफ रिपोर्टर v/s चिफ मिनिस्टर! #Politics #CMvsCR

पत्रकार महादेव खांडेकर काँग्रेसमध्ये दाखल

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यातील आघाडीचे दैनिक तरूण भारतचे माजी चिफ रिपोर्टर महादेव खांडेकर यांनी शनिवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे महादेव खांडेकर हे तरूण भारतचे चिफ रिपोर्टर होते आणि ते चिफ मिनिस्टर अर्थात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून येत असल्यानेच या प्रवेशाला महत्व प्राप्त झालंय.

सध्याच्या परिस्थितीत साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना प्रबळ प्रतिस्पर्धी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना केक वॉक मिळणार असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. साखळीतील काँग्रेसचे नेते तथा साखळीचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार धर्मेश सगलानी यांनी मुख्यमंत्र्यांना साखळी नगरपालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलंय.

साखळीच्या अंतर्गत भागात मात्र सगलानी यांचा विशेष प्रभाव पडू शकलेला नाही आणि तिथेच मुख्यमंत्र्यांनी आपलं स्थान पक्क करून ठेवलंय. महादेव खांडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे आता या स्थानाला धक्का पोहचणार असल्याचा दावा काँग्रेसने केलाय.

साखळीची उमेदवारी मिळणार ?

गेली बरीच वर्षे महादेव खांडेकर हे पत्रकारितेत होते. दैनिक तरूण भारतच्या गोवा आवृत्तीचे ते चिफ रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. त्यांचा एक विशेष दबदबा होता. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची कुजबूज बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यांनी कुडणे या गावांत कामालाही सुरूवात केली होती. एवढं करून एक दिवस अचानक त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सक्रीयपणे राजकारणात उडी घेतली. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील पोकळी भरून काढण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आगामी विधानसभेत साखळी मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक उघडपणे करीत आहेत. तसे स्पष्ट संकेत काँग्रेस नेत्यांकडून मिळताहेत.

शनिवारी त्यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी धर्मेश सगलानी यांची अनुपस्थिती मात्र वेगळंच चित्र तयार करून गेली. तिथे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी सुंदोपसुंदी सुरू होईल,अशी शक्यता वर्तविली जाते. धर्मेश सगलानी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांचे समर्थक आहेत. विश्वजित राणे हे आता भाजपात असल्याने साखळी मतदारसंघ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निर्धोक बनवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. विश्वजित राणे यांचं काही प्रमाणात वजन साखळी मतदारसंघात असल्याने त्यांची मर्जी मुख्यमंत्र्यांना राखावी लागणार आहे अन्यथा ते देखील मु्ख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात,असेही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

पत्रकारिता आणि राजकारण

आत्तापर्यंत पत्रकारितेतून राजकारण प्रवेश केलेल्यांत अनेकांचा समावेश आहे. त्यात दैनिक गोमंतकसाठी पत्रकारिता करणारे म्हापशाचे सुरेंद्र सिरसाट आणि गोमंतकसाठीच शिरोड्यातून वार्ताहर म्हणून काम करणारे महादेव नाईक हे राजकारणात यशस्वी होऊ शकले. सुरेंद्र सिरसाट हे माजी सभापती राहीलेत तर महादेव नाईक हे माजीमंत्री होते. या व्यतिरीक्त विधानसभा स्तरावर अनेक पत्रकारांनी पक्षसंघटनेत काम केले पण निवडणूक रिंगणात मात्र त्यांना यश मिळवला आले नाही. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतचे गोवा आवृत्ती संपादक राजू नायक हे दैनिक लोकसत्तामध्ये असताना त्यांनी मडगावातून काँग्रेसच्या उमेदवारीवर भाजपात दाखल झालेले दिगंबर कामत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

तत्पूर्वी 1989 मध्ये ज्येष्ठ पत्रकार सुरेश काणकोणकर यांनी काणकोणमधून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. 1999 मध्ये भाजपने तत्कालीन इंग्लीश हेराल्डचे चिफ रिपोर्टर ज्युलीओ डिसिल्वा यांना कुंकळ्ळीतून उमेदवारी दिली होती पण त्यांचा पराभव झाला. ज्यूलीओ डिसिल्वानंतर चिफ रिपोर्टर या नात्याने महादेव खांडेकर हे दुसरे पत्रकार थेट राजकीय रिंगणात उतरणारे ठरले आहेत. आत्तापर्यंत पत्रकारितेतून राजकारण्यांना शिंगावर घेणारे महादेव खांडेकर आता राजकीय रिंगणात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कसे शिंगावर घेतात आणि जनतेच्या अपेक्षांची कशी पूर्तता करतात हेच पाहावं लागणार आहे.

खाण व्यवसाय आणि साखळी मतदारसंघ

साखळी मतदारसंघ हा प्रामुख्याने खाण व्यवसायावर अवलंबून असलेला मतदारसंघ आहे. राज्यात 2012 पासून भाजपचं सरकार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनीच खाण व्यवसाय बंद केला आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या व्यवसायावर गंडांतर आणलं. खाणबंदीमुळे साखळीतील अनेक खाण व्यवसायाशी संबंधीत लोक आर्थिक अडचणीत सापडलेत. गेली आठ वर्षे सरकार खाण व्यवसाय सुरू करणार असल्याचे आश्वासने लोकांना देत आहेत. महादेव खांडेकर यांचे कट्टर समर्थक निळकंठ गांवस हे उत्तर गोवा खनिज ट्रक मालक संघटनेचे नेते होते.

ते महादेव खांडेकर यांच्यामागे ठामपणे उभे आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता खाण अवलंबितांचा पाठींबा मिळवण्याकडेच काँग्रेसचा अधीक भार असेल हे स्पष्ट दिसते आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्य खाण विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अलिकडेच अर्थसंकल्पात केलीय. या महामंडळामार्फत खाण अवलंबितांना दिलासा देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. ह्यात साखळीतील खाण अवलंबितांचा पाठींबा कायम ठेवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात यावरूनच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. आत्तापर्यंत साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे भाष्य करणारा किंवा त्यांना थेट आव्हान देणारा नेता कुणीच नव्हता. महादेव खांडेकर यांच्या रूपात मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना तो आता मिळणार असल्याने त्याचा कितपत प्रभाव पडतो यावरूनच या मतदारसंघातील चूरस निश्चित होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!