सुकूरच्या माजी झेडपींच्या घराला भीषण आग

चार लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पर्वरी : सुकूरच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य वैशाली किसन सातार्डेकर यांच्या भुतकीवाडो-सुकूर इथल्या घराला आग लागून सुमारे चार लाखांचं नुकसान झालं. स्थानिकांसह म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येऊ लागला. त्यानंतर देवघर असलेल्या खोलीतील साहित्यानं पेट घेतला. त्यावेळी घरात सातार्डेकर यांच्यासह त्यांची सासू आणि मुलं होती. आग लागल्याचं कळताच इतर सातार्डेकर कुटुंबीय आणि शेजारी धावून आले. त्यांनी बादल्या आणि कळशीतून पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात म्हापसा अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी सुमारे एक तास प्रयत्न करून आपल्या तसेच पिळर्ण अग्निशामक दलाच्या बंबांच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. या आगीत दोन एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर, सोफा सेट, सिलिंग, कपडे, देवघर आणि भांडी जळून खाक झाली. घराच्या छपराचा निम्मा भाग कोसळून पडला.

मोठा अनर्थ टळला…

सातार्डेकर कुटुंबीय तसेच स्थानिकांनी प्रसंगावधान राखून गॅस सिलिंडर आणि काही वस्तू घराबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे चार लाखांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. तिस्क-सुकूर ते सांगोल्डा या हमरस्त्यालगतच वैशाली सातार्डेकर यांचं घर आहे. समाजकार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी सुकूर झेडपी मतदारसंघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती कळताच शेकडो स्थानिकांनी धाव घेतली.

म्हापसा अग्निशामक दलाची यशस्वी झुंज

आग लागल्याची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली. दलाचे अधिकारी सूरज शेटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली चालक-आॅपरेटर स्वप्नेश कळंगुटकर, जवान विष्णू नाईक, भगवान पाळणी, नितीन मयेकर तसेच पिळर्ण अग्निशामक दलाचे उपअधिकारी दामोदर पेडणेकर, चालक-आॅपरेटर श्यामसुंदर पाटील, जितेंद्र बाली, रुद्रेश पांढरे, भावेश शिरोडकर यांनी प्रयत्नांची शर्थ करून आगीवर नियंत्रण आणले तसेच मालमत्तेची संभाव्य मोठी हानी टाळली.

सखोल तपास करून संशय दूर करा : खंवटे

पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. वैशाली सातार्डेकर यांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने तसेच पोलिसांनी घटनास्थळी येण्यासाठी विलंब लावल्याने खंवटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारामागे घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून सत्य उजेडात आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

पाहा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!