गोवा मुक्तीला 60 वर्षं झाली तरीही हणखणे धनगर वाड्यावर रस्त्याचा पत्ता नाही

'मिशन फॉर लोकल'च्या राजन कोरगावकरांनी पुढाकार घेऊन बनवला कच्चा रस्ता

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पाच वर्षांपूर्वी इब्रामपूर गाव दत्तक घेऊन आदर्श गाव बनवण्याचं स्वप्न ग्रामस्थांना दाखवलं होतं. मात्र या गावची परिस्थिती अजूनही तशीच आहे. या गावात अजूनही मुलभूत सोयी-सुविधा पोचलेल्या दिसत नाहीत. गोवा मुक्त होऊन ६० वर्षं झाली. या साठ वर्षांत या गावाला देऊ मांद्रेकर, शंभू भाऊ बांदेकर, बाबू आजगावकर, राजेंद्र आर्लेकर हे आमदार म्हणून लाभले. या साठ वर्षांत इब्रामपूरातील हणखणे धनगर वाडीत त्यांना पक्का रस्ता करता आला नाही. रस्ता नसल्याने या गावातील ग्रामस्थांना प्रवास करण्यात बरीच कसरत करावी लागतेय.

हेही वाचाः जनसुनावणीवेळी दक्षिण गोव्यातील नागरिक आक्रमक

राजन कोरगावकरांनी घेतला पुढाकार

दोन महिन्यापूर्वी ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर हे एका खेळाच्या बक्षीस वितरण समारंभाला या भागात आले होते. त्यावेळी त्यांनी या धनगर वाड्याला भेट दिली. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रस्ता नसल्याने लोकांना येणाऱ्या अडचणी स्थानिकांनी मांडल्या. त्यावेळी राजन कोरगावकरांनी त्यांना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं. त्यांनी गावातील युवकांसोबत जाऊन रस्त्यासाठी लागणाऱ्या जमीन मालकाकडे चर्चा केली. जमीन मालकाने रस्त्यासाठी हिरवा कंदील दाखवला. स्थानिक युवक, गावातील नागरिक आणि जमीन मालकाच्या सहकार्याला ‘मिशन फॉर लोकल’च्या राजन कोरगावकरांनी पाठबळ दिलं. युवकांच्या वाढत्या उत्साहातून कच्चा रस्ता तयार झाला.

खासदाराने कोणत्या पद्धतीने गावचा विकास केला हा संशोधनाचा विषय

या ठिकाणी रस्त्या नसल्यानं धोकादायक स्थितीतील पाटावरून गावातील लोकांना ओहळ आरपार करावा लागत असे. जीव मुठीत घेऊन लोकांना रोज प्रवास करावा लागायचा. आजारी गरोदर स्त्रियांना पाळण्यातून न्यावं लागायचं. ही स्थिती आहे धनगर वाडी परिसराची. याच परीसरासोबत इब्रामपूर गाव केंद्र सरकारने संसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतला. खासदाराने कोणत्या पद्धतीने हा गाव आदर्श केला, हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे.

हेही वाचाः पुन्हा एकदा रस्ता खचला! 10 दिवसांतली दुसरी घटना

निवडणून आलेले लोकप्रतिनिधी ठरलेत अपयशी

आतापर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना या वाड्यासाठी एक कच्च्या रस्ता करण्यात यश मिळवता आलं नाही. मात्र ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर हे भूमिपुत्र असल्यानं त्यांनी स्थानिक जमीनदाराकडे चर्चा केली आणि रस्त्याच्या कामाला सुरुवातही केली. त्याबद्दल धनगर वाड्यावरील लोकांनी त्यांचे आभार मानले. तसंच आगामी निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर केला.

स्थानिक भूमिपुत्रच खऱ्या अर्थाने स्थानिकांच्या समस्या समजू शकतो

या भागात एकूण २० घरं आहेत. मुलं सुशिक्षित आहेत, मात्र घराकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वाडयापर्यंत रस्ताच उभारला नव्हता. सध्या पावसाचे दिवस असल्यानं सुरुवातीला मी स्थानिकांना घेऊन जमीनदाराकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. जमिनदारानेही सहकार्य करण्याचं वचन दिलं. त्यांच्या सहकार्यातून सध्या कच्चा रस्ता केला आहे. एकच खंत वाटते, की छोट्या छोट्या समस्या लोकप्रतिनिधींनी सोडवलेल्या नाहीत. स्थानिक भूमिपुत्रच खऱ्या अर्थाने स्थानिकांच्या समस्या समजू शकतो, चर्चेद्वारे त्या सोडवू शकतो, असं ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांनी माहिती देताना सांगितलं.

हेही वाचाः गोव्याचा घात करणाऱ्यांना नैसर्गिक न्याय मिळाला

आजपर्यंत मुलभूत गरज असलेला रस्ता का बनवला नाही?

गोवा मुक्ती नंतरही या भागात पक्का रस्ता झाला नाही ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. नोकऱ्या देण्याची वल्गना करणाऱ्यांनी आजपर्यंत मुलभूत गरज असलेला रस्ता का बनवला नाही, असा सवाल कोरगावचे माजी सरपंच राजू नर्से यांनी केला. या पुढे स्थानिक उमेदवारालाच संधी देऊन तुमची कामे करून घ्या, असं आवाहनही नर्सेंनी स्थानिकांना केलं.

हा व्हिडिओ पहाः Video | ONLINE EXAM | 80 टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये यश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!