लग्नानंतर २५ वर्षांनीही महिला विभक्त होण्यासाठी आयोगात!

कौटुंबिक छळ, सोशल मीडियावरील प्रेमाची कारणे; महिन्याला सरासरी ७५ तक्रारी

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: लग्नानंतर २५ ते ३० वर्षांचा संसार करून आणि मुलं मोठी झाल्यानंतरही पतीपासून विभक्त होण्यासाठी अनेक स्रिया राज्य महिला आयोगाकडे धाव घेत आहेत. त्यात अगोदर कौटुंबिक छळ झालेल्या तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून पती किंवा स्वतः इतर व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्या महिलांचाही समावेश आहे.

हेही वाचाः सिलिंडर पुन्हा एकदा २५ रुपयांनी महागला, किंमत ८००च्या पार

महिला आयोगाबाबत राज्यात जागृती

महिला आयोगाबाबत राज्यात हळुहळू जागृती होतेय. त्यामुळे लग्नानंतर अनेक वर्षं छळ भोगलेल्या महिला आता तक्रारी घेऊन येतायत. तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे लग्न झालेल्या ज्या महिला इतर व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आहेत किंवा त्यांचा पती इतर महिलेच्या प्रेमात पडलेला आहेत, अशा महिलाही घटस्फोटासाठी महिला आयोगाकडे येत असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिलीये.

हेही वाचाः फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीत गोवा तिसऱ्या क्रमांकावर

महिला आयोगाबाबत राज्यभर प्रसार आणि प्रचार

महिला आयोगाकडे सध्या महिन्याला सरासरी ७५ तक्रारी दाखल होत असून, त्यातील ८० टक्के तक्रारी घरगुती हिंसाचारासंदर्भातील असल्याचं गावडे म्हणाल्या. राज्यात महिला आयोग कार्यरत आहे. तेथे आपल्याला तक्रार नोंदवून न्याय मागता येतो हे बऱ्याच महिलांना माहिती नव्हतं. पण गेल्या काही वर्षांपासून महिला आयोगाबाबत राज्यभर प्रसार आणि प्रचार होत असल्यामुळे तसंच वयाने मोठ्या झालेल्या मुलांची ही साथ मिळत असल्याने लग्नानंतर २५-३० वर्षे छळ भोगत आलेल्या महिला आता घटस्फोटासंदर्भात महिला आयोगाकडे येतायत. गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या महिलांनी आयोगाकडे पती तसंच कुटुंबातील इतर व्यक्तींबाबत तक्रारी केल्या असून, आयोग त्यांच्या तक्रारीवर सुनावण्या घेत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

त्रिकोणी कुटुंबाची मानसिकता वाढीस


मी, पती आणि एक मुलगा किंवा मुलगी इतकंच आपलं त्रिकोणी कुटुंब असावं, अशी मानसिकता लग्नानंतरच्या काही वर्षातच मुलींची बनत चाललीये. त्यामुळे अशा मुली मोठ्या कुटुंबात राहू इच्छित नाहीत. त्यांचं आपली नणंद, दीर किंवा सासू – सासऱ्यांशी पटत नाही. याउलट काही कुटुंबांत पतीचे कुटुंबीयच सुनांना पटवून घेत नाहीत. त्यामुळेही घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ होत असल्याचं विद्या गावडे म्हणाल्या.

आयोगाचे लवकरच डिजिटलायजेशन


राज्य महिला आयोगाचं डिजिटलायजेशन करण्यासंदर्भातील प्रयत्न आपण सुरू केलेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही चर्चा केलीये. त्यामुळे पुढील काही महिन्यांतच महिलांना ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडे तक्रारी करता येतील. आयोगाची स्वतंत्र वेबसाईट व अॅपही तयार करण्यात येणार असल्याचंही विद्या गावडेंनी सांगितलं. मेंटल हेल्थ केअर तसंच करोना काळात घरीच असलेल्या शाळकरी मुलींच्या मानसिकतेत झालेल्या बदलाबाबत सर्व्हे करून डाटा जमविण्याचा विचारही आयोगाकडून सुरू आहे, असंही विद्या गावडे यांनी नमूद केलं.

हेही वाचाः ‘जीएचआरडीसी’तील ७५० नोकऱ्यांसाठी हजारो अर्ज!

विद्या गावडे म्हणाल्या…


नवीन लग्ने झालेल्या जोडप्यांमध्ये लग्नानंतर अवघ्या तीन – चार महिन्यांतच विविध कारणांनी खटके उडताहेत. त्यामुळेही नुकतंच लग्न झालेल्या अनेक तरुणीही पतीपासून विभक्त होण्यासाठी आयोगाशी संपर्क साधताहेत. अशा तक्रारीनंतर आपण प्रथम त्यांची मानसिकता लक्षात घेतो. त्यांच्याशी चर्चा, समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. गेल्या सहा महिन्यांत आपल्या प्रयत्नांमुळे काही जोडपी पुन्हा एकत्र आलीत. पण जे एकत्र येण्यास तयार नाहीत, अशांना मात्र न्यायालयात पाठवल्याशिवाय पर्याय राहत नाही, असंही विद्या गावडे यांनी स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!