गोव्याच्या ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना

150 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा लोंढा बैठकीस उपस्थित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर गोव्याच्या ‘हिंदु महाआघाडी’ची आज स्थापना करण्यात आली. गोव्यातील सर्व तालुक्यातील विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या 77 संस्थाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 150 प्रतिनिधींच्या बैठकीत एकमताने संमत झालेल्या एका ठरावाद्वारे हिंदु महाआघाडी- स्थापनेची घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आली.

150 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा लोंढा बैठकीस उपस्थित

गोव्यातील छोट्यामोठ्या किमान 1000 हिंदु संस्थांशीं संपर्क करून त्यांना या हिंदु महाआघाडीत सहभागी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून शनिवार 27 नोव्हेंबर रोजी संस्था-प्रतिनिधींचा एक हिंदु महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आजच्या बैठकीसाठी प्रतिसादाचा अंदाज नसल्यामुळे आयोजकांनी 30 खुर्च्या मावणारा सिद्धार्थभवन मधला दुसऱ्या मजल्यावरचा छोटा शारदा हाॅल आरक्षित केला होता. परंतु प्रत्यक्षात 150 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा लोंढा बैठकीस लोटल्यामुळे, मोठ्या सभागृहात बैठक हलवावी लागली.

देशात हिंदु समाजाची लांडगेतोड

सुरुवातीला हिंदु महाआघाडीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी संपूर्ण देशात, विशेषता दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यात हिंदु समाजाची चाललेली लांडगेतोड उदाहरणांसह सांगितलीच. परंतु गोव्यातही हिंदुहित कसे लाथाडले जात आहे, फुटिरतावादाला कसे खतपाणी घातले जात आहे याचे निवेदन केले. पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या पाकिस्तानी आतंकवादी आय.एस.आय.या संघटनेची सक्रियता वाढत चालली आहे. हजारो बेकायदेशीर घूसखोर रोहिंग्या व बांगलादेशीना आधारकार्डे, रेशनकार्डे पुरवून राजकीय सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना पोसून गोव्यात ठिकठिकाणी छोटी पाकिस्ताने निर्मिलेली आहेत याची माहिती दिली.

कार्यकर्त्यांची उपस्थिती

यावेळी झालेल्या प्रकट चर्चेत हिंदु पुनरुत्थानचे श्रीकांत बर्वे, हिंदु जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर, मळकर्णे सार्वजनिक गणपती मठाचे अरुण नाईक, योगपीठाचे डाॅ. सूरज काणेकर, भगवा हिंदु वाहीनी वास्कोचे शहा, मातृशक्ती गोवाप्रमुख शुभांगी गावडे, छ. संभाजीमहाराज स्मारक समितीचे ईश्वर कुबल, केपे- आमोणा मठाचे लक्ष्मण बोरकर आणि सनातन संस्थेचे चेतन राजहंस यांनी हिंदु महाआघाडीच्या कार्यपद्धतीबाबत मौलिक सूचना केल्या.

हिंदु महाआघाडी पुढील समान कार्यक्रमांच्या बिंदूंवर कार्य करील असे ठरले:

1 – धर्मांतर-विरोध

2 – भू-जिहाद, नार्कोटिक जिहाद, लव्ह जिहाद – विरोध

3 – हिंदु सुरक्षा

4 – मंदिर सुरक्षा

5 – हिंदु संस्कार रक्षा व धर्म शिक्षण

गोव्यातील हिंदुहितासाठी आवश्यकता पडेल तसे सर्व राज्यातील हिंदु संघटनांशी संपर्क, संबंध जोडून त्यांचे सहकार्य घेण्यात येईल. हिंदु संस्थांनी या पहिल्याच प्रयत्न बैठकीस दिलेल्या अनपेक्षित प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व ऋणनिर्देश निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी करून बैठकीची सांगता करण्यात आली.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!