मॉविनविरुद्ध एलिनाही आक्रमक

कुठ्ठाळीत वीस वर्षे गुदिन्हो अपयशी ठरल्याचा ठपका : शिष्टाचार खात्याचे मंत्रिपद सोडावे

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्यासोबतचा वाद शमलेला असतानाच मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावरून आक्रमक झालेल्या आमदार साल्ढाणा यांनी मंत्री गुदिन्हो यांच्यावर आरोपबाजी करत, शिष्टाचारासंबंधी नियम व कायदे माहीत नसतील, तर गुदिन्हो यांनी शिष्टाचार खात्याचे मंत्रिपद सोडावे, असा निशाणा साधला.

हेही वाचाः फोटोग्राफी इज लव अफेयर उईथ लाईफ !

मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपांना आमदार साल्ढाणा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिले. मॉविन गुदिन्हो वीस वर्षे कुठ्ठाळीचे आमदार होते. त्या काळात त्यांनी हाती घेतलेला एकही प्रकल्प पूर्ण केला नाही. तसे असल्यास त्यांनी तो प्रकल्प दाखवून द्यावा, असं आव्हान आमदार साल्ढाणा यांनी दिलं. गुदिन्हो यांना शिष्टाचारासंबंधी नियम व कायदे माहीत नसतील, तर त्यांना राजशिष्टाचार खात्याच्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकारच नाही. त्यांनी तत्काळ या खात्याचे मंत्रिपद सोडावं, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदार एलिना साल्ढाणा पुढे म्हणाल्या, कुठ्ठाळी मतदारसंघातील कार्यक्रमात आपल्यावर आरोप करणारे मंत्री गुदिन्हो यांना असुरक्षित वाटत आहे, हे स्पष्ट होतं. असुरक्षित वाटत असतं तेव्हाच दुसऱ्यांच्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केले जातात. कासावली प्राथमिक आरोग्य केंद्र, कुठ्ठाळी मार्केट आदींचे श्रेय घेण्यासही ते मागे पुढे पाहणार नाहीत, असा टोलाही साल्ढाणा यांनी हाणला. सांकवाळ पठारावरील कला भवनाबाबत आपणास जबाबदार ठरवलं जातं. परंतु गुदिन्हो यांनी कला भवनासंबंधी करावयाचे सोपस्कार केलेच नसल्यानं त्या प्रकल्पासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांच्या विनंतीवरून आपण कला भवन प्रकल्पात लक्ष घातलं आहे, असं साल्ढाणा यांनी सांगितलं. कोठे काय बोलावं यासंबंधी नियंत्रण राहिले नसल्याने वरिष्ठ नेत्यांनी गुदिन्हो यांना आवर घालण्याची आवश्यकता आहे. आमदार साल्ढाणा यांनी सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्यावरही टीका केली. आठ महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत मॉविन यांनी कुठ्ठाळीत विकास केला नाही. कला भवन पूर्ण करण्यासाठी साल्ढाणा धावपळ करत आहेत, असं सांगणारे बोरकर आता भलतेच काही बोलत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचाः पुण्यात मोदी भक्तानं उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर, मंदिराची शहरात चर्चा

दरम्यान, आमदार एलिना साल्ढाणा यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात कोणताही विकास केला नाही. आपण केलेल्या विकासकामांचे श्रेय त्या घेत असल्याचा आरोप मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मंगळवारी सांकवाळ येथे एका कार्यक्रमात केला होता.

हेही वाचाः गोव्यात मुलींना सुरक्षित वाटतंय का?

आम्हाला विध्वसंक वृत्तीचे म्हणणाऱ्यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात आम्हीच भाजपचे बीज रोवले, हे लक्षात ठेवावं. पंचायतीचा कारभार दुसरीकडे हलविण्यासंबंधी कोणी व कधी ठराव घेतला? इमारतीच्या भाडेपट्टीसंबंधी कोणी निर्णय घेतला? नियमांना बगल देऊन पंचायतीचा कारभार दुसरीकडे हलविण्यात आला आहे. बेकायदा गोष्टी करणाऱ्यांची मंत्री गुदिन्हो पाठराखण करत असल्याचे दिसून येतं, असा आरोप तुळशीदास नाईक यांनी केला.

हेही वाचाः छोटासा असला तरी या गोष्टीत गोवा नंबर एक आहे! एकदा वाचाच..

सरकारी कार्यक्रमाला आमदारालाच निमंत्रण नाही

नारायण नाईक म्हणाले की, जेव्हा विरोधी आमदाराच्या मतदारसंघामध्ये सरकारी कार्यक्रम असतो, तेव्हा तेथील विरोधी आमदारालाही निमंत्रित केले जाते. कुठ्ठाळी मतदारसंघात तरी भाजपचा आमदार आहे. असं असतानाही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

हेही वाचाः आयपीएलचा थरार प्रेक्षकांना थेट मैदानातून अनुभवता येणार का?

गुदिन्होंचा फटकळपणा भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी

वाहतूकमंत्री तथा दाबोळीचे आमदार मॉविन गुदिन्हो हे भाजपमधील अनेक आमदार, मंत्र्यांच्या रडारवर आहेत. यापूर्वी एका मंत्र्यासोबत हुमरीतुमरीवर आलेले त्यांचे प्रकरण बरेच गाजले होते. त्यानंतर गुदिन्हो यांचा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याशी वरचेवर वाद होत आहे. महसूल मंत्र्यांच्याही एका प्रस्तावावर त्यांनी मध्यंंतरी सही करण्यास नकार दिल्यामुळे अंतर्गत वाद झाला होता. मुरगाव तालुक्यातील काही मतदारसंघांमध्ये त्यांचा वाढलेला हस्तक्षेप भाजपच्या काही आमदारांना अस्वस्थ करत आहे. आता कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासोबतही त्यांचा वाद उघड झाला आहे. भाजपातील अनेक मंत्री, आमदारांसोबत गुदिन्हो यांचे पटत नसल्यामुळे भाजपसाठी हा नवाच विषय डोकेदुखीचा ठरला आहे. भाजपमध्ये राहून भाजपविरोधात बोलणाऱ्या काही आमदारांना प्रत्युत्तर देण्यासाठी गुदिन्हो सक्रिय असतात; पण त्यांच्या या स्वभावामुळे भाजपमध्ये अस्वस्थताही वाढली आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Job Opportunity | Government Job | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! वीज आणि आरोग्य खात्यात नोकरभरती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!