वीज विभागाने केलं दिवस-रात्र काम; बुधवारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत

भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक संदेश साधलेंची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः काही तासांसाठी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने राज्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. या चक्रीवादळाने राज्यात विध्वंस निर्माण केला खरा. मात्र या सगळ्यात या वादळाने सर्वांत जास्त नुकसान कुणाचं केलं असेल तर ते म्हणजे वीज खात्याचं. चक्रीवादळामुळे राज्यात वीज खात्याचं झालेलं नुकसान भरून काढण्याचं मोठं आव्हान राज्याच्या वीज खात्यासमोर होतं. मात्र वीज विभागाच्या कर्मचारी तसंच इतर यंत्रणेने दोन दिवस मान मोडून दिवस-रात्र काम केलं आहे, असं भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक संदेश साधलेंनी सांगितलं.

वीज विभागाचं प्रचंड नुकसान

वीज विभागाने राज्यातील ८० टक्के भागांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवलं आहे, तर उर्वरित २० टक्के भागातील काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. उरलेलं २० टक्के काम पूर्ण करण्यासाठी तसंच वीज पुरवठा पूर्ववत करून सामान्य परिस्थिती परत आणण्यासाठी विभागाचे कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत. चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान हे खूप मोठं आहे. सुमारे 700-800 लो टेन्शन खांबे हे चक्रीवादळात जमीनदोस्त झालेत, तर १०० हून अधिक हाय टेन्शन ११ केव्ही खांबे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. २०० डीटीसीमध्ये दोष निर्माण झाला असताना ३० हून अधिक वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्रे नष्ट झाली आहेत. चक्रीवादळामुळे पडलेले चार ते पाच ३३ केव्ही टॉवर परत उभे करण्यातही विभाग व्यस्त आहे. अनेक इलेक्ट्रिक कंडक्टर बंद पडले आहेत तर किलोमीटरच्या वीज केबल्स खराब झाल्या असल्याचं साधलेंनी म्हटलंय.

फ्रंटलाईन लढवय्यांची कसोटी

कोरोना महामारीच्या या काळात आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी आता पोलिस, अग्निशमन दल, पीडब्लूडी, डब्लूआरडी आदी खात्यांच्या कामगारांचं जोरदार काम सुरू आहे. यात पालिका आणि पंचायत पातळीवरील कामगारही त्यांना साथ देत आहेत. अनेक ठिकाणी कोसळुन पडलेले वीजेचे खांब उभे करण्यास यंत्रणा सज्ज झालीये. झाडं वीजखांबांवर पडल्यानं वीज पुरवठा खंडीत झालाय. तो पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान वीज खात्यासमोर आहे. मुख्य तथा अंतर्गत रस्ते झाडांच्या पडझडीमुळे वाहतूकीसाठी खंडीत झाल्यामुळे ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे. वीज खंडीत झाल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!