BREAKING | वीज कनेक्शन वाचवायचंय तर ही बातमी वाचाच

तीन महिन्यांनंतर बिल दिल्यास ‘फॉर डिसकनेक्शन’ शिक्का मारून ग्राहकाला देणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तुम्ही जर वेळेत वीज बिलं भरत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वीज बिलं वेळेत न भरणाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय वीज मंत्री निलेश काब्राल यांनी घेतलाय. वीज बिल जारी केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत ते भरावं, अन्यथा संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे. तीन महिन्यांनंतरचं बिल देतानाच ‘फॉर डिसकनेक्शन’ असा शिक्का मारून ग्राहकाला ते दिलं जाईल, अशी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.

भविष्यात वीजेचा तुटवडा भासू नये म्हणून….

विजेची निर्मिती राज्यात होत नाही. राज्याला ६५० मेगावॅट वीजेची गरज आहे. ही सर्व वीज इतर राज्यांतून येते. म्हणूनच तमनार प्रकल्पातून वीज आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय पाण्याच्या लाटा आणि पवनचक्की यांद्वारे वीजनिर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. भविष्यात वीजेचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहे, असे मंत्री काब्राल यांनी म्हटले आहे.

वीज बिल भरण्यात ग्राहकांकडून चालढकल

राज्यात सुमारे साडेपाच लाख वीज ग्राहक आहेत. यातील चार लाख ग्राहक वेळेत बिलं भरतात. दीड लाख ग्राहक चालढकलपणा करत राहतात. यातील काहीजण वर्षानंतर, तर काहीजण दोन वर्षांनंतर बिलं भरतात. काहीजणांना वीजपुरवठा खंडित केल्यानंतरच जाग येते. वीज बिलं थकल्याने खात्याला मोठा फटका बसतो. खात्याच्या महसुलावर परिणाम होतो. ग्राहकांना वेळेत बिलं फेडण्याची सवय लागावी, यासाठी तीन महिन्यांनंतर वीज बंद करण्याची कारवाई केली जाईल, असं मंत्री काब्राल यांनी म्हटलं आहे.

ग्राहकांचा आळस, वीज खात्याला फटका

विजेच्या क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू असताना, ग्राहकांकडूनही योग्य प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. अशा स्थितीत सुमारे दीड लाख ग्राहक बिलं थकवून ठेवताहेत. याचा फटका खात्याला बसतोय. यापुढे अशी थकबाकी राहू नये आणि ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लागावी, यासाठी तीन महिन्यांनंतर वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. थकीत बिलं भरण्यासाठी सरकारने सुरू केलेली ओटीएस योजनेची मुदत संपल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्याच्या कारवाईस आरंभ केला जाईल, असं काब्राल यांनी स्पष्ट केलं आहे.

वीजमंत्री म्हणतात…

  • आतापर्यंतच्या थकीत बिलांची वसुली व्हावी आणि ग्राहकांनाही दिलासा मिळावा, यासाठी सरकारने डिसेंबर २०२० पासून एकरकमी बिल भरणा (ओटीएस) योजना सुरू केली आहे. याचा २ लाख ग्राहकांनी लाभ घेतला. या योजनेद्वारे आतापर्यंत १७० कोटी वसूल झाले आहेत. २४० कोटी येणं बाकी आहे.
  • ओटीएस योजनेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरी मुदतवाढ २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. ही योजना सुरू होण्यापूर्वी ४१३ कोटींची थकबाकी होती. अजूनही एक लाख ग्राहकांची थकबाकी आहे. त्यांना दोन हप्त्यांत बिलं भरण्याची मुभा देण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!