‘कदंब’च्या ताफ्यात तब्बल 30 इलेक्ट्रिक बसेस

प्रदूषणावर मात करण्यासाठी कदंब महामंडळ सज्ज

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कदंब वाहतूक महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण मंगळवारी करण्यात आलं. आगामी काळात हे महामंडळ स्वयंपूर्ण होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यावेळी व्यक्त केली.

हवेतील प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणात अनेक घातक बदल झाले आहेत. या पुढील काळात मानवी जीवन सुखकर व्हायचं असेल, तर प्रदूषण कमी करण्यावाचून पर्याय नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने विजेवर चालणार्‍या वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध राज्यांना इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या. गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाला पहिल्या टप्प्यात 50 पैकी 30 इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar) यांनी या सोहळ्याला व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थिती लावली. इलेक्ट्रिकल वाहनांचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं. 6 हजार 265 बसेस 65 शहरांसाठी केंद्र सरकारनं दिल्या.

वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो (Mauvin Godinho) यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब महामंडळाच्या कार्याचं कौतुक करताना कर्मचार्‍यांना शाबासकी दिली. पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिकल बसेस आणि वाहनं गरजेचं असल्याचं सांगितलं. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या वाहनांच्या वापराला लोकांनी प्राधान्य द्यावं, असं ते म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!