काणकोणात रंगणार निवडणुकीची रस्सीखेच

संजय कोमरपंत | प्रतिनिधी
काणकोणः विधानसभा निवडणुकीला सहा महिने बाकी असताना राजकीय पक्षाचे संभावित उमेदवार सक्रिय झाले आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेश सचिव महादेव देसाई, भाजपचे उपाध्यक्ष रमेश तवडकर, भाजपचे आमदार इज़िदोर फर्नांडिस, अपक्ष म्हणून विजय पै खोत तसंच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक यांचा समावेश आहे.
हेही वाचाः मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कॅसिनो सुरू करावेत
काँग्रेसच्या महादेव देसाई यांनी पक्षाचं तिकीट आपल्यालाच मिळणार अशी आशा बाळगून गांवडोंगरी पंचायत क्षेत्रात प्रचार कार्य पूर्ण करत खोतीगाव पंचायत क्षेत्रात प्रचाराला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटाकरिता पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई इच्छुक आहेत. जनार्दन भंडारी व महादेव देसाई हे करोना काळात रुग्णांना ऑक्सीजन सिलिंडर पुरवणं, मास्कचं, सेनिटायझरचं वाटप, करोना रुग्णांसाठी गाडीची व्यवस्था, पालिकेने हटविलेल्या गाड्यावाल्यांच्या प्रश्नांसंबंधी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणं, गुळे येथे ट्रक चालकाच्या चुकीमुळे ११ गुरांचा जागीच मृत्यू असा कोणता ना कोणता कार्यक्रम घेऊन जनतेपुढे येतात. मात्र काँग्रेसचे तिकीट कुणाला हे गुलदस्त्यात आहे.
‘एकला चलो रे’
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश तवडकर तसंच भाजपाचे आमदार इज़िदोर फर्नांडिस यांचा मतदारांकड़े पूर्वीपासून संपर्क असून सध्या सेनिटरी पॅड वाटपाच्या बहाण्याने ते आणि त्यांचे भाजपा समर्थक कार्यकर्ते वाड्यावाड्यावर पोहचले आहेत. मात्र भाजपच्या तिकीटावर दोघांनीही दावा केला आहे. एका म्यानात तीन तलवारी मावणार नाहीत मात्र त्यातील विजय पै खोत यांनी भाजपच्या तिकीटाचा नाद सोडला असून त्यांनी अपक्ष उमेदवारी भरण्याचा निर्णय घेत ‘एकला चलो रे’ चा मार्ग अवलंबला आहे. भाजपकड़े अनुसूचित जातीजमातीमधील तवडकर हेच एकमेव उमेदवार असून त्यांना तिकीट दिल्यास इतर मतदारसंघात अनुसूचित जातीजमातीची मते मिळू शकतात. मात्र काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या इज़िदोर फर्नांडिसना २०२२ च्या निवडणुकीत तिकीट देणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळेल असा दावा इज़िदोर करतात. भाजपाला दोघांमधील समेट घडवून आणावा लागणार आहे.
हेही वाचाः बेपत्ता रुद्रेश सापडला; आईवडिलांनी मानले पोलिसांचे आभार
बांधणीचं काम कसं काय पुढे नेणार?
रमेश तवडकर, विजय पै खोत व इज़िदोर फर्नांडिस या नेत्याचे म्हणून वेगवेगळे समर्थक आहेत. या कार्यकर्त्यांना पक्ष लागत नसून त्यांना आपला नेता लागतो. भाजपाच्या नेत्याप्रमाणेच विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही दुफळी असून एकामेकांशी वैर असलेले हे कार्यकर्ते पक्ष बांधणीचं काम कसं काय पुढे नेणार हा प्रश्न आहे.
हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासाला खीळ
सरकारने मंजूर केलेलं हे बिल कचराकुंडीत फेका
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक यांनी लोकसंपर्क वाढविला असून त्यांनी माशे, लोलये, गांवडोंगरी, खोतीगांव तसंच श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन आपल्या पक्षाची ध्येयधोरणे मतदारांना सांगून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी २८ ऑगस्टला ते काणकोणात गोवा फॉरवर्डचे कार्यालय उघडणार आहेत. भाजपला हरवणे हा आपला एक कलमी कार्यक्रम असून काँग्रेस पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे ते सांगतात. भूमिपुत्र अधिकारणी बीलावरून काणकोणमधील विविध ठिकाणच्या भूमिपुत्रांना एकत्र करून सरकार विरोधात व भूमिपुत्र बीलासंबंधात त्यांनी सरकारचं वाभाडं काढलं. निवडणुकीत मतांचे गणित बांधून बिगर गोमंतकीयांना सरकार भूमिपुत्राचा दर्जा देऊ पाहत आहे असा आरोप करून सरकारने मंजूर केलेलं हे बिल कचराकुंडीत फेकण्याची मागणी करून वातावरण गरम केलं आहे.
हेही वाचाः भाजपविरोधी आघाडीच्या काँग्रेसकडून हालचाली!
बिगर गोमंतकीयाची मतेच नकोत
आर.जी.चे प्रमुख मनोज परब तर बिगर गोमंतकीयाची मतेच नकोत असे सांगतात. राजकीय काम करतो तो चळवळ म्हणून, क्रांती करण्याकरिता उमेदवार घडविण्याकरिता नव्हे. आम्ही क्रांतिकारी म्हणून काम करतो, कार्यकर्ता म्हणून नव्हे. येत्या काही दिवसात आर.जी.चे काम काणकोणवासियांना दिसून येणार असा विश्वास त्यांनी काणकोणवासियांना दाखविला आहे.
हेही वाचाः मोठी राजकीय बातमी! अखेर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला
२००२ ला हिंदूंच्या मतांची विभागणी झाल्याने इज़िदोर विजयी झाले
२००४ मध्ये इज़िदोरनी काँग्रेसचा राजीनामा दिला. २००५ ला झालेल्या पोटनिवडणुकीत ते भाजपातर्फे विजयी झाले. त्यानंतर अवघ्या ४ महिन्यात त्यांनी पुन्हा आमदारकीचा राजीनामा दिला व या पोटनिवडणुकीत मतदारांनी त्यांना सहानुभूती न दाखवता झिडकारले व रमेश यांना कवेत घेतले. काँग्रेसची कॅथोलिक मते फुटल्याने तवडकर विजयी झाले. २००७मधल्या सरळ लढतीत पुन्हा रमेश विजयी झाले. २०१२ ला तवडकर (भाजप) १४३२८ मते घेऊन विजयी झाले. २०१७ च्या निवडणुकीत रमेश व विजय यांच्यामध्ये मत विभागणी झाल्याने इज़िदोर निवडून आले.
हेही वाचाः ‘भूमी अधिकारिणी’ रद्द झाल्यास तीव्र आंदोलन!
आत्ताच्या मतदार यादीत काणकोण नगरपालिका क्षेत्रात १०३८४, आगोंद पंचायत ३२९९, खोतीगाव २१३४, गावडोंगरी ३९५६, लोलये ४५७०, श्रीस्थळ ३८०७, पैंगीण ५७९९, त्यात पुरुष १६६५६ तर १९२९३ महिला मतदार आहेत, एकूण मतदार ३३९४९ आहेत.
दोन्ही बाजूंनी तिकीटासाठी रस्सीखेच
काँग्रेसच्या बाजूने महादेव देसाई, जनार्दन भंडारी तर भाजपच्या बाजूने इज़िदोर फर्नांडिस, रमेश तवडकर तिकीटाचे दावेदार आहेत. दोन्ही बाजूंनी तिकीटासाठी रस्सीखेच आहे. याचा परिणाम मतदानावर होऊन निवडणुकीत कोणालाही लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काम काहीच दिसत नाही. आदिवासी समाजातून अशोक भिवा वेळीप सुद्धा यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.ते निवडणुकीत उतरल्यास आदिवासींची मते फुटण्याची शक्यता आहे.