मार्च अखेरपर्यंत २५ इलेक्ट्रीक बसेस गोव्यात!.. पाहा फर्स्ट लूक

मडगावात चार्जिंग स्टेशन

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून गोव्यासाठी मंजूर झालेल्या १५० इलेक्ट्रीक बसेसमधील २५ बसेस मार्च अखेरपर्यंत राज्यात दाखल होतील. त्यांच्यासाठी मडगावात विशेष चार्जिंग स्थानकही उभारण्यात येत आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे​ व्यवस्थापकीय संचालक एस. एल. घाटे यांनी दिली.

अवजड उद्योग मंत्रालयाने स्टार्ट-अप इंडिया प्रकल्पांतर्गत देशातील विविध राज्यांना सुमारे पाच हजार इलेक्ट्रीक बसेस देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार गोव्याला १५० बसेस मिळाल्या आहेत. त्यातील ५० बसेस लवकरात लवकर देण्याची मागणी राज्याने केंद्राकडे केली होती. त्यानुसार ५०
पैकी २५ बसेस मार्चअखेर, तर २५ बसेस एप्रिलपर्यंत गोव्यात दाखल होतील. ५० इलेक्ट्रीक बसेससाठी २५ चार्जिंग स्टेशनची गरज होती. त्यामुळे मडगाव येथे २५ चार्जिंगचे विशेष स्थानक उभारण्यात येत आहे, असे घाटे म्हणाले.

प्रदूषणाला आळा

राज्यात कार्बनची पातळी कमी असली, तरी प्रदूषण मात्र वाढत आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पेट्रोल, डिझेलसाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागते. पण वीज मात्र देशातच तयार होते. भविष्यकाळात विजेवर चालणाऱ्या
इलेक्ट्रीक बसेसची​ संख्या वाढल्यास भारताला पेट्रोल, डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज भासणार नाही. शिवाय यातून स्टार्ट-अप इंडिया मोहिमेलाही चालना देता येऊ शकते हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने देशभरात इलेक्ट्रीक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही घाटे यांनी नमूद केले.

बसेस वाढल्यानंतर पणजीतही चार्जिंग स्थानक

एका इलेक्ट्रीक बसला तीन तास चार्जिंग केल्यानंतर ती २५० किमी अंतरापर्यंत धावू शकते. राज्यात येणाऱ्या इलेक्ट्रीक बसेस पणजी, मडगाव, वास्को व कारवार या मार्गांवर धावणार आहेत. २५० किमी अंतर कापून बस पुन्हा मडगाव चार्जिंग स्थानकावर येईल, अशाप्रकारे वेळापत्रक तयार
करण्यात येईल. बसेसची संख्या वाढल्यानंतर पणजीत दुसरे चार्जिंग स्थानक उभारण्यात येईल, अशी माहितीही एस. एल. घाटे यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.