नेरुल येथे अर्भक टाकणाऱ्या संशयित वृद्धास अटक

सोमवारी सकाळची घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित बंदिस्त; संशयित आरोपी निवृत्त सरकारी कर्मचारी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: मेहुणीसोबत अनैतिक संबंधातून झालेलं एका महिन्याचं अर्भक बेवारसरीत्या टाकल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी कांदोळी येथे राहणाऱ्या मूळ पश्चिम दिल्ली येथील एका ६१ वर्षीय संशयित वृद्धास अटक केली आहे. संशयित निवृत्त सरकारी कर्मचारी आहे.      

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ

सोमवारी सकाळची घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली होती. फट्टावाडा – नेरूल येथील फिर्यादीने आपल्या घरासमोरील व्हरांड्यात  कोणी अज्ञाताने अर्भक ठेवून पळ काढल्याची तक्रार दिली होती. सकाळी उठल्यानंतर घराच्या व्हरांड्यात एका बास्केटमध्ये अर्भक असल्याचं आढळून आलं. ती मुलगी होती. लागलीच संबंधित व्यक्तीने पर्वरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या अर्भकाला ताब्यात घेऊन त्याला गोमेकॉमध्ये दाखल केलं. ते बालक सुदृढ असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यास ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचाः गोव्यातील खाण व्यवसायावरील अवलंबितांचं संरक्षण करण्यात भाजप अपयशी

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित बंदिस्त

घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित बंदिस्त झाला होता. या फुटेजच्या आधारे संशयिताला पकडण्यासाठी पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीअंती संशयित कांदोळी येथे एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्रीच संशयिताला पकडून ताब्यात घेण्यात आलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला भारतीय दंड संहितेच्या ३१७ व गोवा बाल कायदा कलम ८ (२) खाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिलिंद भुईंबर, नोलास्को रापोझ, सुदेश नाईक व सहकार्यांनी संशयिताला पकडून अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक सीताराम मळीक करीत आहेत.

हेही वाचाः भाजपकडून शिक्षक विभागाची स्थापना

संशयित आरोपी निवृत्त सरकारी कर्मचारी

या प्रकरणातील संशयित आरोपी हा निवृत्त सरकारी कर्मचारी असून गेल्या काही महिन्यांपासून तो आपल्या कुटुंबीयांसह कांदोळी येथे वास्तव्यास होता. मेहुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही मुलगी त्यांना झाली होती. पेन्शनच्या मिळकतीवर नवजात मुलीचं पालन पोषण करणं शक्य नसल्यानं ते टाकण्याचा निर्णय  संशयिताने घेतला. या मुलीचा सांभाळ करणारे एखाद्या आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या घरी नेऊन त्या अर्भकास ठेवण्याचा चंग त्याने बांधला होता. त्यानुसार त्यांना नेरूल येथील ते घर चांगलं वाटलं होतं, अशी कबुली संशयिताने पोलिस चौकशीत दिली आहे.    

हा व्हिडिओ पहाः MGP | HIGH COURT | लवू मामलेदार यांची याचिका रद्दबातल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!