एकनाथ खडसे ‘ईडी’ कार्यालयात दाखल ; चौकशी सुरू

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे खडसे अडचणीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर गुरुवारी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसे गुरुवारी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र त्याआधीच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटरवरुन देण्यात आली होती. त्यानंतर खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ईडीच्या चौकशीसाठी जाणार असल्याचे सांगितले होते.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर चौकशी सुरू झाली आहे, असा आरोप केला. “या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे”, असे खडसे म्हणाले.

“ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!