EDITOR’S POINT | कुंकळ्ळीकरांच्या हौतात्म्याला न्याय मिळाला ?

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
संपूर्ण आशिया खंडात विदेशी राजवटीविरोधात भूमिपुत्रांनी केलेला पहिला उठाव आणि तो देखील गोमंतभूमीत. 15 जुलै 1583 च्या दिवस इतिहासात नोंद असूनही दुर्लक्षित राहीला आहे. पोर्तुगिज राजवटीत त्यांनी गोव्यात काबीज केलेल्या दक्षिणेतील सासष्टी या तालुक्यातील कुंकळ्ळीत गावांत हा रक्तरंजीत उठाव झाला होता. 1961 साली गोवा भारताचा भाग बनला. तत्पूर्वी 1583 साली म्हणजेच 378 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची भारतालाही विशेष दखल घ्यावी असं वाटलं नाही. तसं कारणही नव्हतं कारण भारत देश 1947 साली ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र होऊन अस्तित्वात आला. गोवा मुक्तीच्या 62 व्या वर्षी आणि घटनेच्या 440 व्या वर्षानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळीतील हा उठाव राष्ट्रीय युद्ध स्मृती दिन म्हणून साजरा होईल,अशी घोषणा केली. या स्मृतीनिमित्त दरवर्षी राज्याचे प्रतिनिधी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहतील,असेही ठरले. एवढेच नव्हे तर या घटनेची दखल अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात करून राज्यातील भाजप सरकारने कुंकळ्ळीच्या या उठावाची दखल घेतली हे महत्वाचे.

स्वराज्य, स्वधर्म हे खरं पण स्वअस्तिवाचं काय ?
कुंकळ्ळीच्या या घटनेची प्रत्येकजण आपापल्यापरिने व्याख्या लावतात. पोर्तुगिज धर्मांतरणविरोधातले हे बंड असल्याचे सांगून संघ आणि तत्सबंधीत विचारसरणीचे लोक या घटनेची दखल घेतात. धर्मरक्षण आणि स्वराज्याचा हा लढा असल्याचेही सांगितले जाते परंतु हे करत असताना तो प्रकार स्वअस्तित्वाचा लढा होता हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. धर्मातरणाचा जाच तर होताच पण सर्वसामान्य लोकाचं जगणंच हैराण करून त्यांच्या अस्तित्वावरच टाच आणण्याचा जेव्हा प्रकार घडला तेव्हा कुंकळ्ळी आणि आसपासचे गांवकरी भडकले. गांवकरी पद्धतीनुसार ते गांवचे प्रमुख होते तरिही त्यांच्यावर वेगवेगळ्या कारणांत्सव कर लादण्यात येत होते. या कर भरण्याला त्यांनी नकार दिला. जेव्हा गावांत हिंदूंची धार्मिक स्थळे उध्वस्त करून तिथे चर्च उभारण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा मात्र संयमाचा कडेलोड झाला आणि त्यातून हा रक्तरंजीत उठाव झाला. या उठावाची दखल घेणे क्रमप्राप्तच आहेच परंतु या उठावानंतर 16 वीरांची कपटनितीने केलेली हत्या आणि इतर गांवकऱ्यांना भोगाव्या लागलेल्या यातना यांचाही अभ्यास होणे गरजेचे होते.

कुंकळ्ळीच्या गांवकऱ्यांनी उठावात 5 पाद्री आणि त्यांना सहाय्य करणारे इतर 5 अशा दहाजणांना ठार केले. पण त्या बदल्यात 16 वीरांचे प्राण त्यांनी घेतले. एवढेच नव्हे तर त्यांच्या घरेदारे, जमिन, शेती सर्व काही जप्त करण्यात आले. ग्रामसंस्था बरखास्त करण्यात आली आणि कुंकळ्ळी आणि आसपासच्या गावांना देशोधडीला लावले. या हुतात्म्यांचे स्मरण करताना त्यांच्याकडून हिरावून घेतलेल्या काही गोष्टी म्हणजे मुख्यत्वे जमिन त्यांना परत देता येणे शक्य नाही का, याचा विचार होणे गरजेचे आहे. या विषयाकडे मात्र आपले राजकारणी सोयीस्करपणे नजरआड करतात. घडून गेलेल्या काही गोष्टी बदलता येत नसतीलही पण त्याबाबतची चाचपणी करण्यात काय गैर आहे. पोर्तुगिजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांची माहिती मिळण्यासाठी जर पोर्तुगालात जाऊन त्यांचे पुरातन दस्तएवज तपासण्याची तयारी सरकार करत असेल तर पोर्तुगिजांच्या राजवटीत इथल्या सर्वसामान्य गोंयकारांच्या जमिनी कशा पद्धतीने जप्त करण्यात आल्या. या जमिनी कुणी लिलावात घेतल्या आणि कुणाच्या जमिनी कुणाकडे गेल्या याचीही माहिती निश्चितच मिळू शकेल.

15 जुलै कुंकळ्ळीकरांचा उठाव, 16 ऑक्टोबर हुतात्मा दिन
मुळात 15 जुलै 1583 चा उठावाचा दिवस आणि कुंकळ्ळीचे हुतात्मे या दोन गोष्टी आहेत, ते समजून घेणे गरजेचे आहे. 15 जुलै 1583 हा कुंकळ्ळीच्या उठावाचा दिवस, पण या उठावाचा वचपा काढण्यासाठी पोर्तुगिजांनी कट रचून ज्या 16 जणांना ठार केले तो दिवस 16 ऑक्टोबर १५८३ म्हणजे उठावाच्या तीन महिन्यानंतर. आता 15 जुलै हा दिवस कुंकळ्ळीचा हुतात्मा दिवस असं आपण म्हटलं तर त्यातून वेगळ्याच इतिहासाला मान्यता मिळण्यासारखे होईल.

15 जुलैच्या उठावात कुंकळ्ळीवासियांनी मंदिरांची नासधुस करून तिथे चर्चा उभारण्यासाठीच्या जागेचा शोध घेण्यासाठी आलेल्या ज्या 5 प्राद्र्यांना यमसदनी धाडले त्यांना 1741 मध्ये तत्कालीन कॅथोलिक चर्चने रोम येथे हुतात्मे घोषित केले. 16 एप्रिल 1893 रोजी सेंट पिटर्स रोम येथे तशी घोषणा करण्यात आली. यानंतर 1893 साली त्यांचे हौतात्म्य पहिल्यांदा गोव्यात साजरे करण्यात आले. कुंकळ्ळीत त्यांच्या नावे सध्याच्या हुतात्मा स्मारकाजवळच चर्चकडून या पाद्रांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले छोटेचे चर्च अजूनही उभे आहे. दरवर्षी दरवर्षी 26 जुलै रोजी त्यांच्या स्मरणार्थ फेस्त साजरे केले जाते. पाच पाद्री आणि त्यांना गांवचा रस्ता आणि माहिती पुरवणारे अन्य पाच अशी दहा जणांची हत्या १५ जुलै रोजी संतप्त झालेल्या कुंकळ्ळीवासियांनी केली होती.

277 वर्षानंतरच पोर्तुगिजांचा संपूर्ण गोव्यावर ताबा
‘ज्यांचे राज्य त्यांचा धर्म’ या तत्वावर पोर्तुगिजांची राजवट सुरू होती. श्रीपाद गोविंद देसाई यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीवरून गोवा बेटावरील हिंदूची सर्व देवालये 28 जून 1541 पर्यंत मोडून टाकण्यात आली. त्यानंतर 1543 मध्ये बारदेश व सासष्टी (मुरगावसहीत) हे दोन तालुके पोर्तुगीजांच्या ताब्यात आले. तिसवाडी, बारदेश, सासष्टी व मुरगाव या तालुक्यांना जुन्या काबिजादी म्हणतात.

1764 मध्ये फोंडे, सांगे, केपे व काणकोण हे चार तालुके सौदेकरांकडून बळकावले. डिचोली, सत्तरी व पेडणे हे तालुके 1788 मध्ये सावंतवाडी संस्थानाकडून घेतले. या सातही तालुक्यांना नवीन काबिजादी म्हणतात. आज ज्याला आपण गोवा प्रदेश म्हणतो त्या गोवा प्रदेशावर पोर्तुगीजाने साडेचारशे वर्षे राज्य केले असल्याचा दावा आणि पोर्तुगीजधार्जिण्या लोकांनी वेळोवेळी केल्याचे दिसून येते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे गोमंतक म्हणून ओळखण्यात येणारा प्रदेश संपूर्णपणे आपल्या सत्तेखाली आणण्यास पोर्तुगीजांना 277 वर्षे प्रयत्न करावे लागले.
कुंकळ्ळीकरांचा असहकार आणि पोर्तुगिजांचा अहंकार
श्रीपाद देसाई म्हणतात त्याप्रमाणे पोर्तुगिजांनी धर्मांतरणाला गती मिळवून दिली होती. ठिकठिकाणी हिंदूंची मंदिरे उध्वस्त करून चर्च उभारण्याचे सत्र सुरू केले होते. धर्मातराच्या या हुकूमशाहीला विशेष विरोध केला तो असोळणे, वेळ्ळी, आंबेली, कुंकळ्ळी आणि वेर्डे या गावातील शूर आणि जिद्दी गावकऱ्यांनी. या पाचही गावच्या नागरिकांनी पोर्तुगीजांच्या जबरदस्तीला एकजुटीने तोंड दिले. कारण या गावात क्षत्रियांचे वास्तव्य जास्त, शिवाय लोक लढवय्या वृत्तीचे होते. आपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूनी सनदशीर मार्गानि प्रयत्न केले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट काही नवी बंधने हिंदूंवर लादण्यात आली. कुंकळ्ळीकरांनी पोर्तुगीज सत्तेबरोबर असहकाराचे शस्त्र उभारले. प्रथमतः त्यांनी सरकार दरबारी खंड भरण्यास नकार दिला. रायतूरच्या न्याय मंडळावर त्यांनी बहिष्कार टाकला. कुंकळ्ळीच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी आणि खंड वसुल करण्यासाठी पोर्तुगीजांनी इस्तेव्हाव रोड्रिंक्स नावाचा फार कठोर व क्रूर अशा अधिकाऱ्याला पाठविले. त्याने लोकांचा छळ चालविण्यास सुरूवात केली. लोक त्यांना घाबरत असत.

कुंकळीच्या लोकांनी असोळणे, वेळळी, आंबेली आणि बेर्डे गावातील लोकांची एकजूट केली आणि गावकऱ्यांनी त्याला व त्याचे सहकारी या सर्वांना असोळणे येथे ठार मारले. या प्रकारामुळे पोर्तुगीज चिडले. त्यांनी पाचही गावातील देवळे जमीनदोस्त केली. ठिकठिकाणी आगी लावल्या. त्या आगीत पुष्कळ लोक जखमी झाले. घरदार सोडून लोक पळून गेले. अनेकांच्या कत्तली करण्यात आल्या.. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर गाव सोडून पळालेले लोक पुन्हा आपल्या गावात परतले. त्यांनी पुन्हा घरे, मंदिरे उभी केली आणि गावातील मंदिरांचा जिर्णोद्धार केला. या शिवाय अनेक छोटी मंदिरे पुन्हा उभारली.
अखेर उठाव झालाच
कुंकळ्ळी गावातील पवित्र स्थळे बाटवण्याचे सत्र सुरू होतेच. पाद्री रोदोल्फ यांनी कुंकळ्ळी गावात चर्च बांधायचे ठरवले. चर्चसाठी जागा निवडायची म्हणून काही पाद्रींना पाचारण केले. कुंकळी गावात येण्यापूर्वी आंतोनियो फ्रान्सिस्को या धर्मोपदेशकाने तेथील गांवकऱ्यांना उद्देशून एक पत्र पाठविले होते. ख्रिश्चन धर्मोपदेशक शांतपणे कुंकळ्ळी गावात येणार आहेत. त्याचे योग्य स्वागत व्हावे. कुंकळ्ळीतील नवख्रिस्त्यांनी पाद्रीच्या स्वागतासाठी मंडप उभारला होता. पोर्तुगिजांच्या जाचाला कंटाळलेल्या हिंदूंनी मात्र ही संधी साधून त्यांना अद्दल घडविण्याचा चंग बांधला. तो दिवस होता सोमवार. 15 जुलै 1583 ओडली गावातून पाद्री लोक कुंकळी गावात शिरले. पाद्री लोक मंडपात बसले. तिथे गांवकरी आले होते. तिथे अचानक गांवकऱ्यांचा जमाव संतप्त झाला. या पाद्र्यांना अद्दल घडविण्याचा तयारीत हातात तलवारी, भाले, बर्च्या, धनुष्यबाण, काठ्या इत्यादी घेऊन आले होते. तिथूनच हल्ला करण्यात आला.

अशा तऱ्हेने कुंकळीच्या भूमीवर सन 1583 च्या जुलै महिन्याच्या 15 तारखेला खवळलेल्या जनतेने एकूण दहा जणांची हत्या केली. या सर्वांची प्रेते एका डबक्यात टाकण्यात आली. व त्यावर माती टाकण्यात आली. ती प्रेते ताब्यात घ्यायला कोणी धजत नव्हते. दोन दिवसानंतर पोर्तुगीजांनी ती सर्व ते उकरून काढली व रायतूरच्या सेमिनरीमध्ये दफन करण्यात आली. सदर डबक्याच्या ठिकाणी पोर्तुगीजांनी सेंट झेवियर नावाचे चॅपेल आणि ज्या ठिकाणी पाद्रीना कंठस्नान घातले त्या ठिकाणी तळेभाट येथे त्याच्या स्मृत्यर्थ पोर्तुगीजांनी हुतात्म्याचे चॅपेल बांधले आहे.

आणि पोर्तुगिजांनी बदला घेतला
15 जुलैच्या घटनेने पोर्तुगाल, रोम आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये खळबळ माजली. पोर्तुगिज सरकारने या कृत्याबद्दल गावकऱ्यांना कडक शासन केले. पाचही गावच्या जमीनी त्यांच्याकडून काढून घेतल्या आणि गावकरी संस्था जप्त करण्यात आल्या. या घटनेने त्यांची झोप उडाली होती. सूड घेण्याची योजना ते आखत होते. अखेर पोर्तुगीज आणि गावकऱ्यांमध्ये कायम स्वरूपाच्या शांतता करार प्रस्तावावर चर्चा करून समेट घडवून आणण्यासाठी गावकऱ्यांना आमंत्रित करण्याचे ठरविले. मध्यस्थीचे केंद्र म्हणून साळ किनाऱ्यावरील असोळणेच्या किल्याची निवड करण्यात आली होती. दोन्ही पक्षामध्ये समेट घडवून शेवटचा सोक्षमोक्ष लावण्याचे निश्चित करण्यात आले. गावकऱ्यांनी आपला होकार पोर्तुगीजांना कळविला.

16 गावकऱ्यांना पाचारण करण्यात आले. तारीख निश्चित करण्यात आली. ती 16 ऑक्टोबर 1583. चर्चा चालू असताना किल्ल्याचा एकमेव प्रवेश दरवाजा बंद करण्यात आला. किल्याच्या सभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. अखेर विश्वासघाताने पंधरा निशस्त्र वीरांना ठार मारण्यात आले. एकटा संधीचा फायदा घेऊन निसटला. ते सोळा महानायक 1) काळगो उर्फ काळू नाईक 2) मुळको उल्को मोलू नाईक, 3) आग उर्फ वाघ नाईक, 4) सांतू चाती, 5) राम गडणे उर्फ रामा नाईक 6) खाप्रू नाईक, 7) शाबू नाईक, 8) टोपी नाईक, 9) जंग उर्फ झांग नाईक,10) पोळपुटो नाईक, 11) भजरो नाईक 12) शांता शेट 13) विठोबा नाईक 14) येसू नाईक 15) गुणो नाईक 16) जिबलो नाईक
कुंकळ्ळीकरांच्या जमिनींचे काय ?
आता कुंकळ्ळीचा हा एतिहासिक उठाव आणि 16 विरांनी पत्करलेले हौतात्म्य याची केवळ आठवण काढून आणि त्यांना श्रद्धांजली देऊन हा विषय संपणार आहे का. खऱ्या अर्थाने जर आपल्याला या हुतात्म्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या जमिनी ज्या पोर्तुगिज सरकारने जप्त केल्या त्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. केवळ स्मारकाला राष्ट्रीय मान्यता देऊन किंवा पाठ्यपुस्तकात धडा घालून आपण समाधानी होता कामा नये. कुठलाही लढा किंवा क्रांती का केली जाते. त्याचे ध्येय काय असते. ते ध्येय जर साध्य झालं नाही तर त्याला अर्थ नाही. गोवा मुक्तीची 62 वर्षे झाली तरी कुंकळ्ळीवासियांना पोर्तुगिजांनी हडप केलेल्या जमिनींची मालकी किंवा ताबा न मिळणे हा आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल. ज्या भूमिसाठी आणि जमिनींसाठी कुंकळ्ळीवासियांनी हा लढा उभारला तीच आजतागायत त्यांची होऊ शकत नसेल तर मग आपलं स्वातंत्र्य आणि मुक्ती याला अर्थ काय राहीला.

कुंकळ्ळीवासियांनी Sociedade Agricola Gauncares de Cuncolim e Veroda Society स्थापन केली. या सोसायटीवर कोर्टाने प्रशासक नेमला आणि त्यामार्फत या जमिनीचे व्यवस्थापन केले जाते. सहजिकच संपूर्ण गावाची जमिन जी पोर्तुगिज शासकांनी जप्त केली होती, त्याचे व्यवस्थापन सोसायटीमार्फत करण्याची वेळ कुंकळ्ळीवासियांवर आली आहे. या जमिनीची मालकी कुंकळ्ळीवासियांकडे येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सरकार म्हणून जी काही कायदेशीर मदत लागते ती सरकारने देणे गरजेचे आहे. या सोसायटीच्या कारभारातही अनेक गैरकारभार झालेत आणि हे प्रकरणी जमिन घोटाळा प्रकरणी चौकशी करणाऱ्या एसआयटीकडे पोहचले आहे.

पोर्तुगिजांच्या खाणाखुणा जर खरोखरच मिटवायच्या असतील तर पोर्तुगिजांनी किंवा त्यांच्या शासनाचा आधार घेऊन काही ठरावीक लोकांना ज्या सर्वसामान्य गोंयकारांच्या जमिनी बळकावल्या होत्या, त्या मुळ भूमिपुत्रांना परत करणे हाच अंतीम न्याय होऊ शकतो. पुरातत्व खात्याचे दरवाजे बंद करून दस्तएवजांचा गैरवापर टाळता येईल पण या दस्तएवजांत किती मुळ गोंयकारांच्या मालकीचे दाखले असूनही आज ते आपल्या हक्कांपासून वंचित आहे, त्यांना स्वेच्छेने न्याय देण्यासाठी सरकारची काय योजना आहे, याचे उत्तर सरकार काय देऊ शकेल. पुरातत्व खात्याच्या बंद दरवाज्यात जमिनींच्या मालकिची कागदपत्रे असूनही गरीब, सर्वसामान्य गोंयकार तिथे पोहचू शकत नाही किंवा पोर्तुगिज भाषेअभावी त्याला ती शोधता येत नाहीत. मग त्याचे भाषांतर करून ते सर्वसामान्य गोंयकारापर्यंत पोहचवणे खरोखरच शक्य नाही का कि गोंयकारांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन या दस्तएवजांत फेरफार करून या गोंयकारांच्या जमिनी लाटण्याची दुसरी पोर्तुगिज मनोवृत्ती आपल्या शासकांत तर तयार झाली नसेल ? गोंयकारांनो नक्कीच याचा विचार करा.