गोव्यातून सिंधुदुर्गात जाताय? मग हे वाचा!

सिंधुदुर्ग प्रशासनाकडून नियम अधिक कडक; गोवा-सिंधुदुर्ग प्रवास करणार तर आता हवा ई-पास

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्र तसंच गोव्यात कोरोना थैमान घातलाय. देशात तर असंख्य लोकांचा प्रत्येक मिनिटाला मृत्यू होतोय. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध उपाय-योजनांचा अवलंब केला जातोय. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग-गोवा सीमाभागात कडक बंदोबस्त करण्यात आलाय. आता गोव्यातून सिंधुदुर्गात जाणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आलेत.

हेही वाचाः COVID-19 ALERT | सिंधुदुर्गात सक्तीचं कॉरंटाईन..

ई-पास हवाच

गोव्यातून सिंधुदुर्गात जायचं असेल तर आता ई-पास अत्यावश्यक करण्यात आलाय. ज्यांच्याकडे हा प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय. सटमटवाडी तपासणी नाक्यावर ई-पासची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारपासून पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येणार आहे.

चाकरमान्यांसाठीही नियम लागू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्यांनादेखील हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यासाठी चाकरमान्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एकदा चाचणी केल्यानंतर त्याची मुदत पंधरा दिवस असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दररोज गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांना ई-पास काढणं आवश्यक आहे.

हेही वाचाः सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी?

गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर सटमटवाडी येथे थर्मल तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आलाय. गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाहनचालकांकडील ई-पास तपासण्यात येणार आहे. ई-पास नसल्यास त्या वाहनांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर तसंच जिल्ह्यात येणाऱ्या अन्य रस्त्यांवर रविवारपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!