डिचोली सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिटचा शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोलीः येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर (सरकारी हॉस्पिटल)मध्ये मंगळवारपासून डायलिसिस युनिट सुरू करण्यात आलं असून ‘अपेक्स किडनी केअर’तर्फे सुरू करण्यात आलेल्या या युनिटचं उद्घाटन सभापती राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झाट्ये, सरपंच गोकुळदास सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर, डॉ. शेखर साळकर, डॉ. शीतल लेंगडे, नगराध्यक्ष कुंदन फळारी, सीमा आरोंदेकर आदी उपस्थित होते.
अपेक्स किडनी केअर युनिटने उत्तम सेवा द्यावी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या पुढाकाराने या केंद्रात ही सुविधा पुरवण्यात आल्यानं सभापती राजेश पाटणेकर यांनी दोघांचं अभिनंदन केलं. तर प्रवीण झाट्ये यांनी या भागात डायलिसिस केंद्राची असलेली गरज सरकारने पुरवल्याने आनंद व्यक्त केला. तसंच या डायलिसिस केंद्रामुळे या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला असल्यानं अपेक्स किडनी केअर युनिटने उत्तम सेवा द्यावी, असं आवाहन केलं.
मोफत सुविधा
या डायलेसिस केंद्रातील सुविधा मोफत असून गरजूंना या सेवेचा लाभ घेणं शक्य होणार आहे. डॉ लेंगडे यांनी या युनिटबाबत सविस्तर माहिती दिली. तर डॉ. मेधा साळकर यांनी सर्वांचे आभार मानले.