डॉ. प्रमोद सावंतांनी केलेल्या कार्यामुळे गोव्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कार्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास मला वाटतो. मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही जाऊ आणि पुन्हा एकदा गोव्यात भाजप सरकारची सत्ता स्थापन करू, असा विश्वास भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचाः खाण कंपन्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

बुधवारी सकाळी केंद्रातील भाजपानं देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. या नियुक्तीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केलंय.

महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी गोव्याच्या पाठीशी

महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी नेहमीच गोव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं सहकार्य गोव्याला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितिन गडकरी या सर्वांची मदत आम्हाला मिळेल. दोन केंद्रीय राज्य मंत्री माझ्यासोबत गोव्यात आहेत. त्यामुळे या सर्वांच्या मदतीने पुन्हा एकदा गोव्यात भाजपचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून मगच सुरू करणार काम

केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून, त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन मगच मी गोव्यात कामाला सुरुवात करण्यात असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. तसंच या नियुक्तीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानलेत.

हेही वाचाः भाजपचे ‘हे’ नेते पाच निवडणूक राज्यांची जबाबदारी घेतील; देवेंद्र फडणवीस सांभाळणार गोव्याची धुरा!

वर्षभरात ५ राज्यांच्या निवडणुका!

येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने आता कंबर कसली आहे. मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांमध्ये या निवडणुका होतील. त्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत.

या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी २०२२ सालात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. याआधी बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी दिली होती. त्या बिहार निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं.

हा व्हिडिओ पहाः Fact Check | #Viral | शिक्षकाच्या धक्कादायक व्हिडीओनं खळबळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!