फोंड्यात पावसामुळे व्यापाऱ्यांचा काहीसा हिरमोड

यंदा पालिकेकडून व्यापाऱ्यांना मुख्य रस्त्यावरच व्यापार मांडण्याची सूट

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: फोंड्यातील बुधवार पेठ बाजारात भरलेल्या चतुर्थी बाजारात सकाळच्या सत्रात पावसाने व्यापाऱ्यांचा हिरमोड केला, तर संध्याकाळच्या सत्रात गर्दी असूनही ग्राहक न मिळाल्याने व्यापारी हिरमुसले. फोंड्यात चतुर्थीच्या खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून तोबा गर्दी उसळत आहे. मात्र गर्दी असूनही व्यापार तसाच पडून असल्याची खंत व्यापारी व्यक्त करत आहेत.

हेही वाचाः ACCIDENT | बसचे ब्रेक फेल झाले, आणि….

यंदा पालिकेकडून व्यापाऱ्यांना मुख्य रस्त्यावरच व्यापार मांडण्याची सूट

गेल्या काही वर्षांपासून फोंड्यातील चतुर्थीचा बाजार सध्याच्या बाजाराच्या मागच्या बाजूला भरावला जायचा, मात्र तेथे ग्राहक मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्या अनुषंगाने यंदा पालिकेने व्यापाऱ्यांना मुख्य रस्त्यावरच व्यापार मांडण्याची सूट दिली असून ते ग्राहकांनाही सोईचे ठरत आहे. मात्र यंदा तालुक्यातील विविध भागात मिळेल तिथे चतुर्थीचे सामान विक्रीस उपलब्ध असल्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना ग्राहक मिळत नसल्याच्या तक्रारी कानी येत आहेत.

कृषिप्रधान फोंडा तालुक्यात सर्वच भागात सध्या माटोळीचे सामान विक्रीस

कृषिप्रधान फोंडा तालुक्यात सर्वच भागात सध्या माटोळीचे सामान विक्रीस उपलब्ध असून यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतोच, मात्र पारंपरिक बाजारकरांना त्याचा फटका बसल्याचे चित्र आहे. यंदा तौकते वादळ, महापूर या सोबतच करोना महामारीमुळे बाजारात आर्थिक उलाढाल कमी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र गणरायाच्या वार्षिक उत्सवानिमित्त भाविकांनी सगळ्या शंका कुशंकांना मुठमाती देत जोमाने खरेदी चालवली असून व्यापाऱ्यांना केवळ पावसाने दगा दिल्याचे चित्र आहे. सध्या फोंड्यात जोमात खरेदी सुरू असली तरी करोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

सत्तर टक्के नागरिक विना मास्क बाजारात

जगभरात करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच फोंड्यात मात्र करोना संपल्याचे चित्र असून शंभरातील सत्तर जण विना मास्क फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसून नागरिकांनाही कोणतीही भीती जाणवत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, फोंड्यात बुधवारी गुरुवारी चतुर्थीच्या बाजाराचा शेवटचा दिवस असून स्थानिक नगरपालिका व पोलीस दलाने या काळात कडक बंदोबस्त ठेवून सामाजिक अंतर व करोना संबंधित अन्य नियम पाळण्याची गरज व्यक्त होत आहे.

हा व्हिडिओ पहाः CM Pramod Sawant on SoP | चतुर्थीच्या SoP मागे घेण्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!