अंमली पदार्थ विक्री ; नायजेरियन नागरिकासह दोघांना कोठडी

हणजुण, पर्रा इथं एनसीबीनं चार जणांना केली होती अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हणजुण आणि पर्रा येथे कारवाई करून चार जणांना अटक केली होती. त्यातील सोफीया फर्नांडिस (३४) आणि ओनायेका एगिके (३६) या नायजेरीयन नागरिकाला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

एनसीबीने सोमवार २८ रोजी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरून गोववाडे – हणजूण येथील आईसक्रिम पार्लर तथा दुकानावर बनावट ग्राहक पाठवून अंमली पदार्थाची मागणी केली होती. त्यावेळी एनसीबीने दुकान मालक रॉक फर्नांडिस याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून एनसीबीने १० ग्रॅमचे ३७ एक्टेसी/ एमडीएमए टॅबलेट्स आणि ३५० ग्रॅम चरस जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने रॉक याची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी चिडी ओसिटा ओकोनकवो उर्फ बेंजामिन या नायजेरीयन याच्याकडून अंमली पदार्थ घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार एनसीबीने नंतर बेजामिन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १०.९ ग्रॅम २३ एक्टेसी /एमडीएमए टेबलेट्स जप्त केले होते. या प्रकरणी त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्या दोघांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर त्या दोघांना मंगळवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालायने न्यायालयीन कोठडीत पाठविले.

याच प्रकरणी एनसीबीने रॉक याची पत्नी सोफिया फर्नांडिसला मंगळवारी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या सोफिला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली. दरम्यान एनसीबीने मंगळवारी पर्रा येथे छापा टाकून आणखीन एक कारवाई केली होती. त्यात ओनायेका एगिके (३६) या नायजेरीयन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून पथकाने २० बोल्ट एलएसडी जप्त केले होते. अटक करण्यात आलेल्या एगिके याला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!