राज्यात पावसाचा हाहाकार; अनेक भागात पूरजन्य परिस्थिती

आज सकाळपर्यंत गोव्यात ८६.५० इंच पाऊसाची नोंद; दक्षिण गोव्यातील सांगेत सर्वाधिक ८.५ इंच पावसाची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडतोय. गेले 2 दिवस राज्यात सर्वच तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था थंडवली आहे. राज्याच्या अनेक भागांत परिस्थिती धोकादायक बनत चाललीये. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून लोकांवर बेघर होण्याची वेळ आलीए. राज्यातील नद्यांनी आक्रमक रूप धारण केलंय. आज सकाळपर्यंत गोव्यात ८६.५० इंच पाऊसाची नोंद झालीये. मागच्या २४ तासांत सांगेत सर्वाधिक ८.५ इंच पावसाची नोंद झालीये. तर साखळीत ७, केपेत ६, फोंडा, काणकोण, ओल्ड गोव्यात प्रत्येकी ४ इंच पावसाची नोंद झालीये. एकूणच परिस्थिती पाहता लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

साखळीतील हरवळे, होंडात नाल्याचं पाणी रस्त्यावर

सत्तरीतील वाळपई, होंडा येथील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झालीये. रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झालीये. त्याचप्रमाणे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे हाल झालेत. होंडा-वाळपई रस्ता पाण्याखाली गेल्यानं अनेक लोक अडकून पडलेत.

साखळीतील वाळवंटीला आला पूर; अनेक घरात पाण्याचा शिरकाव

राज्यातील नद्यांची सद्यस्थिती अत्यंत बिकट होत चाललीये. साखळीतील वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

मासोर्डेत ‘घर बुडालं, नुकसानही मोठं झालं’

मासोर्डे गावातही पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ उडालीये. या गावातील काही घरं तर पाण्यात पूर्ण बुडाली आहेत.

चांदेल पे़डण्यात मुसळधार; पावसाचं पाणी शिरलं शेट्येंच्या घरात

चांदेल पे़डणे येथील शेट्येंच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय. हे पाणी पहाटे 4 वाजता शिरल्याचं समजतंय.

खुटवळ पेडण्यात पाणी आलं धावून; शेती बागायती गेली वाहून

पेडणे तालुक्यातील खुटवळ गावातही इतर गावांप्रमाणेच पाणी शिरल्याने लोकांचे हाल झालेत. नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने लोकांची तारांबळ उडालीये. त्याचप्रमाणे शेती-बागायतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

डिचोलीतील साळ, मेणकुरेला पुराचा वेढा; पाणी वाढता वाढता वाढे…

डिचोली तालुक्यातील साळ गावावर यावर्षीही पूरजन्य परिस्थिती निर्माण झालीये. याची झलक शुक्रवारी दिसून आली. गावातील भुमिका देवीच्या मंदिरात पाण्याने शिरकाव केला आहे. तसंच या परिसरातील काही घरात तसंच दुकानांतही पाणी शिरलंय. संपूर्ण परिसर जलमय झालाय.


उसगावात रस्ते बंद; जिथे तिथे पाणीच पाणी…

उसगाव भागालाही पावसाचा मोठा फटका बसलाय. गावात जिथे तिथे पाणीच पाणी दिसतंय. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. रस्त्यांवर पाणी आल्यानं रस्ते वाहतूकीसाठी बंद झालेत.

वाळपई शहराला पाण्याचा वेढा; शहरातील अनेक घरं पाण्याखाली

वाळपई शहराला पाण्याचा वेढा पडलाय. जिथे पहावं तिथे पाणीच पाणी दिसतंय. वार्ड क्रमांक ३ मध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झालीये. वाळपई पुलावरुन पाणी जात असल्यानं वाहतूक ठप्प झालीये.

सत्तरीतील पैकूळचा पूल कोसळला; गावचा संपर्क तुटण्याची भीती

सत्तरी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये आणि गावातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. त्या पैकूळ गावात जाणारा पूल कोसळल्यानं या गावचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जातेय.

सत्तरीतील दाबोस पाणी पुरवठा प्रकल्पाला पुराच्या पाण्याचा फटका

सत्तरी तालु्क्यातील दाबोस पाणी पुरवठा प्रकल्पाला पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे.

बोळकर्णे साकोर्डा येथे पुलाची दुर्दशा; पूल कोसळण्याच्या दिशेने

बोळकर्णे साकोर्डा येथी पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. पूल कोसळण्याच्या स्थितीत येऊन पोहोचलाय. नदीचं पाणी पुलावरून वाहण्यास सुरुवात झालीये. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

खांडेपार नदीला पूर; शेजारील गावांमध्ये शिरलं पाणी

खांडेपार नदीने रौद्र रुप धारण केलंय. नदीला पूर आल्यानं पाणी रस्त्यावर आलंय. खांडेपार नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं या नदीचं पाणी खांडेपार भागात तसंच शेजारील गावांतील घरांमध्ये शिरल्याची माहिती मिळतेय.

चोर्ला घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे चोर्ला घाटातील दरडी कोसळल्या आहेत. त्‍यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्याच्या कडेच्या झाडासह मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्यानं रस्ता पूर्णपणे दरडीच्या मातीने व्यापला गेला आणि रस्ता वाहतुकीस बंद झाला. या पावसामुळे घाट मार्गातील झाडंही रस्त्यावर कोसळली आहेत.

फोंडा – पाळी‌ साखळी‌‌ रस्ता पाण्याखाली

फोंडा भागालाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या भागातही नदी नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्यानं रस्ता पाण्याखाली गेलाय. दरम्यान जोपर्यंत पाणी ओरसत नाही तोपर्यंत या भागातील वाहतूक सुरू होणं कठीण आहे.

कोनाडीत तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली; पाणी लोकवस्तीत

कोनाडी पेडणे भागात तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी लोकवस्तीत शिरू लागलंय. पाणी लोकांच्या घरात घुसल्याने लोकांची तारांबळ उडालीये.

अनमोड घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प

अनमोड घाटमार्गात दरड कोसळली आहे. यामुळे माती रस्त्यावर येऊन रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला आहे. वारा-पावसामुळे अनेक झाडंदेखील उन्मळून पडली आहेत. अग्निशमन दलाने या ठिकाणी येऊन रस्ता मोकळा करण्यासाठी काम सुरू केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!