हृदयद्रावक! नास्नोळ्यात रोड रोलरखाली येउन चालकाचा मृत्यू

वाचा, कसा झाला हा भीषण अपघात...

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : मृत्यू कोणाला, कुठे, कसा आणि कधी गाठेल, हे सांगता येत नाही. असाच प्रकार नास्नोळा इथे घडला. रोड रोलर चालकाचा रोलरखाली आल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली.

ब्रेक फेल झाले आणि…

आंतोनेथ आब्रु (वय 54, रा. म्हापसा) हा रोड रोलरचालक आपल्या ताब्यातील रोड रोलर घेउन नास्नोळा येथून जात होता. तो रस्त्यावरून जात असताना अकस्मात ब्रेक लागेनासा झाला. रोलर उतरणीवर असल्यामुळे आंतोनेथ भांबावला. त्याने रोड रोलर रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उतरणीमुळे तो थांबेना.

त्याने उडी मारली, पण…

रोड रोलरचे ब्रेक लागत नसल्याचे ध्यानात येताच आंतोनेथने रस्त्यावर उडी मारून जीव वाचवण्याचे ठरवले. तत्पूर्वी त्याने स्टेअरिंग एका बाजूला वळवले. कारण त्याने स्टेअरिंग वळवले नसते, तर रोलर सरळ रस्त्यावरून गेला असता आणि इतर वाहनचालकांना त्यामुळे धोका निर्माण झाला असता. आंतोनेथ उडी मारत असतानाच दुर्दैवाने तो खाली पडला. त्याचवेळी रोलरचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. रोलर रस्त्याकडेच्या मातीच्या भरावाला अडकून थांबला. पण तोपर्यंत आंतोनेथचा हकनाक बळी गेला होता.

बंदी असतानाही रोलर रस्त्यावर कसा?

रोड रोलर रस्त्यावर आणण्यास कायद्याने बंदी आहे. तो रस्त्यावर आणायचा असेल, तर तशी परवानगी संबंधित यंत्रणेकडून घ्यावी लागते. आंतोनेथ चालवत असलेला रोड रोलर कोणाच्या मालकीचा होता? तो चालवण्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती का? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!