डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर, चिखली, कासांवलीतही हॉस्पिटलची सोय

पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण आणि कुडचडेत रूग्णांसाठी सोय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ताळगाव येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी कोविड केअर सेंटरचे इस्पितळात रूपांतर करण्यात येईल. या व्यतिरीक्त चिखली, कासांवलीत बुधवारपर्यंत इस्पितळे कार्यरत होतील. पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण आणि कुडतडे येथे तात्काळ ऑक्सिजनची गरज नसलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर इस्पितळे उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. घरी विलगीकरणात असलेल्या रूग्णांची योग्य तपासणी केली जावी जेणेकरून उपचारांतील दुर्लक्षामुळे अखेरच्या क्षणी रूग्णांकडून इस्पितळात धाव घेण्याचे प्रकार वाढत असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्य यंत्रणेच्या नजरेला आणून दिले.

corona update

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलावलेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परीमल रॉय, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, डीन तसेच सीएमसी आणि सीएमओ सल्लागार हजर होते. सर्वांत प्रथम मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांकडे संवाद साधला. वेगवेगळ्या तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक पॉझिटीव्ह रूग्णाची आणि विशेष करून घरी विलगीकरणात असलेल्या रूग्णांवर देखरेख ठेवण्याची गरज आहे,असेही डॉ. सावंत यांनी सुचवले.

सध्या सर्वंच इस्पितळात रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे नवीन रूग्णांना आणि विशेष करून प्रकृती चिंताजनक बनलेल्या रूग्णांना चांगली सेवा मिळण्याची गरज आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेले पण ऑक्सिजनची गरज नसलेल्या रूग्णांना वेगळ्या ठिकाणी उपचारांसाठी स्थलांतरीत करून इस्पितळातील खाटांचा उपयोग क्रिटीकल रूग्णांसाठी करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त झाले. ताळगाव येथील डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडीयमचे अशा इस्पितळात रूपांतर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. चिखली आणि कासांवली येथे अशेच वॉर्ड तयार करण्यात येतील. अशाच पद्धतीची तात्पूरती रूग्णांसाठीची सोय असलेली इस्पितळे पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण आणि कुडचडे येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य केंद्रांवरील डॉक्टर या इस्पितळांत सेवा बजावतील,असेही यावेळी ठरविण्यात आले.

ही इस्पितळे उभारण्यासाठी तालुका उपजिल्हाधिकारी लॉजीस्टीक मदत पुरवतील. या व्यतिरीक्त रूग्णवाहिका, बालरथ आदींचा उपयोग रूग्णांच्या वाहतूकीसाठी करण्यात यावा,असेही ठरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व कामांवर देखरेख ठेवावी,असंही या बैठकीत ठरलंय.

सर्व डॉक्टर, नर्सेस तसेच प्राथमिक, सामाजिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहनपर संवाद आयोजित करण्याचं ठरलं. सल्लागार तथा तज्ज्ञ डॉक्टर त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविडच्या या काळात कोमोर्बीड परिस्थिती कशी हाताळावी याचेही मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सध्या आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात आपल्या सेवेचे योगदान देत असून त्यांना प्रोत्साहन आणि स्फुर्ती देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!