दवर्लीतील रेल्वे फाटकाजवळचे बांधकाम हटवले

गोवा पोलिस, राखीव सुरक्षा दलाचे पोलिस घटनास्थळी तैनात

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : दवर्ली रावणफोंड येथील रेल्वे फाटकाजवळचे रेल्वे दुपरीकरणाचे काम दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाकडून लांबणीवर टाकण्यात आल्याचे पत्रक ५ नोव्हेंबरला काढण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी कोकण रेल्वेच्या सुरक्षारक्षकांसाठी फाटकाजवळ बांधण्यात आलेली शेड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आली व जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. त्यामुळे कितीही विरोध झाला तरी दुपदरीकरणाचे काम पुढे नेण्याची तयारी सरकारने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

चांदर येथील रेल्वे फाटकाजवळच्या कामाला दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता बंद करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर सामाजिक संघटना व नागरिकांनी आंदोलन करत रेल्वे ट्रॅकवर बसत रात्र जागून काढली होती. या कामाला झालेल्या विरोधानंतर दवर्ली येथील रेल्वे दुपरीकरणासाठीचे बाजूच्या रस्ता रुंदीकरणाचे काम लांबणीवर टाकण्यात आल्याचे पत्रक दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून जारी करण्यात आले होते. त्यानंतरही दवर्ली येथील कामाच्या दिवशी काही संघटनांचे प्रतिनिधी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन विरोध दर्शवला होता. बुधवारी नावेली येथील अवर लेडी ऑफ द रोझरी चर्चचे फेस्त असल्याने नावेली व परिसरातील नागरिक फेस्ताच्या कार्यक्रमात व्यस्त होते. रेल्वे प्रशासनाकडून ही संधी साधून गोवा पोलिस व राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या बंदोबस्तात दवर्ली येथील रेल्वे दुपरीकरणासाठी सपाटीकरणाचे काम करण्यात आले. दवर्ली येथील रेल्वे फाटकाजवळ असलेली सुरक्षारक्षकांसाठीची शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. याशिवाय नेसाय परिसरातील रेल्वेच्या सुरक्षारक्षकांसाठी बांधण्यात आलेली शेडही रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात आलेली आहे.

उर्वरित कामही पूर्ण…

रावणफोंड दवर्ली येथील कामाच्या ठिकाणी परिसरातील काही लोकांनी जमाव करत काम रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही कालावधीसाठी काम थांबवण्यात आले. मात्र, जमा झालेले नागरिक गेल्यानंतर दुपारी रेल्वे प्रशासनाकडून उर्वरित कामही पूर्ण करण्यात आले. सुरक्षारक्षकासाठीची पाडण्यात आलेली शेड ही रेल्वेच्या जमिनीत असल्याने तसेच पोलिस बंदोबस्त असल्याने नागरिकांना ते काम रोखणे शक्य झाले नाही.

संघर्ष होण्याची शक्यता

सुरक्षारक्षकांसाठीच्या शेड पाडून जमिनीचे सपाटीकरण करत दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून दुपदरीकरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत पुढे नेण्यात येणार असल्याचे दाखवून देण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर आता कोळसाविरोधी आंदोलनातील सामाजिक संघटना, पाठिंबा देणारे राजकीय पक्ष व नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!