सीएमआयईच्या बेरोजगारी अहवालावर संशयाचं बोट

आकडा अवास्तव, अविश्वासार्ह असल्याची सरकारची स्पष्टोक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सीएमआयईच्या अनएम्प्लॉयमेंट रेट इन इंडियाच्या ताज्या अहवालात गोव्याच्या बेरोजगारीचं प्रमाण 22.1 टक्के असल्याचं दाखवून गोवा हे देशातील दुसऱ्या क्रमांकावरील राज्य असल्याचं म्हटलंय. राज्य सरकारने मात्र या अहवालाच्या विश्वासाहर्तेवरच संशयाचं बोट दाखवलंय. या संस्थेची अहवालासंबंधीची प्रक्रिया, पद्धत विश्वासार्ह नसल्यानं हा अहवालच अवास्तव आणि अविश्वासार्ह आहे, अशी स्पष्टोक्ती सरकारने दिलीय.

सरकारकडून अहवालावर प्रश्नचिन्ह

राज्य सरकारच्या कामगार आणि रोजगार खात्याने यासंबंधीचं स्पष्टीकरणं दिलंय. सीएमआयईच्या या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर चांगलंच तोंड सुख घेतलंय. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसंच आम आदमी पार्टीनेही सरकारवर सडकून टीका केलीय. या टीकेला चोख प्रत्यूत्तर देताना सरकारने या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

यापूर्वीही असाच गहजब

राज्याचं नेतृत्व डॉ. प्रमोद सावंत यांनी हाती घेतल्यानंतर लगेच डिसेंबर 2019 मध्ये याच संस्थेनं असाच बेरोजगारीचा अहवाल जाहीर केला होता. यात गोवा बेरोजगारीत 34.5 टक्के असल्याचं म्हटलं होतं. यानंतर त्याच संस्थेने जून 2020 मध्ये म्हणजे जेव्हा कोविड महामारीने डोके वर काढलं होतं तेव्हा बेरोजगारीचं प्रमाण 10 टक्के म्हटलं होतं. यानंतर ऑक्टोबरात 10.9 टक्के आणि फेब्रुवारी 2020 मध्ये 2.8 टक्के म्हटलं होतं. ही सगळी टक्केवारीच मुळी गोंधळात टाकणारी ठरलीये. पूर्वीच्या अहवालासंबंधीही राज्य सरकारने आपली हरकत नोंदवली होती. आता या नव्या टक्केवारीतून ही संपूर्ण प्रक्रियाच चुकीची आणि अविश्वासार्ह असल्याचं दाखवून देते, असा दावा सरकारने केलाय.

वेबसाईटचा असाही दावा

सीएमआयईच्या वेबसाईटवर ही संस्था देशातील पहिली खाजगी संस्था आहे जी बेरोजगारीचा आकडा जाहीर करते, असं म्हटलंय. संस्थेने जाहीर केलेल्या टक्केवारीला डेटा टॅग आहे. याचा अर्थ हा डेटा टेस्टींगसाठी टाकण्यात आलाय, असंही सरकारने म्हटलंय. संपूर्ण देशात केवळ 41,100 सॅपलवरून बेरोजगारीचा आकडा कसा काय काढला जाऊ शकतो, असा प्रश्न सरकारने केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!