Double Murder | Video | कामाचे पैसे न दिल्यानेच घडलं दुहेरी हत्याकांड

फातोर्डा दुहेरी खून प्रकरणी तिन्ही संशयित मुंबईतून ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : फातोर्डा चंद्रावाडो येथील ठेकेदार मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅटरीना पिंटो यांच्या खूनप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तिन्ही संशयितांना दादर मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. मिंगेल मिरांडा यांच्याकडून कामाचे पैसे वेळेत न मिळाल्यानेच रागाच्या भरात खून केल्याचे संशयितांनी चौकशीत सांगितले. २४ तासांत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा त्यांना मुंबईहून गोव्यात आणले जाणार आहे.

मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅटरीना यांचा खून झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. मिरांडा यांच्याकडे असलेले तीन कामगार बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. मिरांडा यांच्या मालकीची स्कूटी सोमवारी सायंकाळी वेर्णा रेल्वे स्थानकाबाहेर आढळून आल्याने संशयित रेल्वेतून पळाल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी इतर ठिकाणीही शोधाशोध सुरू केली. संशयित मुंबईच्या गाडीने गेल्याची माहिती मिळताच फातोर्डा पोलीस पाठलाग करत मुंबईला गेले होते. पोलिसांनी संशयितांना दादर मुंबई परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

खून झाल्यानंतर मिरांडा यांच्याकडील तिन्ही कामगार बेपत्ता असल्याने या दुहेरी खूनप्रकरणी बेपत्ता कामगारांवर पोलिसांचा संशय होता. उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग घेण्यास सुरुवात केली होती. सोमवारी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात आला होता, तसेच पोटावरही वार आढळून आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून हातोडा व सुरीसह इतरही साहित्य जप्त केले असल्याने मिंगेल व कॅटरीना यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून सुऱ्याने पोटावर वार केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संशयित बिहार, झारखंड येथील

मिरांडा यांच्याकडे काम करणाऱ्या रविनकुमार श्यामकुमार सादा (१८, रा. बिहार), आकाश अजयकुमार घोष (२०, रा. झारखंड) व आदित्यकुमार रमेश खरवाल (१८, रा. झारखंड) या कामगारांनी गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादर मुंबई येथून त्यांना फातोर्डा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोव्यात आणल्यानंतर तिन्ही संशयितांना रितसर अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुलीने दाखल केली होती तक्रार

दुहेरी खून प्रकरणी मिंगेल मिरांडा यांच्या कन्या जेझुलिना मिरांडा यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अंबाजी चंद्रावाडो फातोर्डा येथे राहाणारे वडील मिंगेल मिरांडा (६८) हे आजी कॅटरिना पिंटो (८६) यांच्यासह राहत होते व सोमवारी सकाळी त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्याचे तक्रारीत म्हटले होते.

मुंबई पोलिसांचे सहकार्य

फातोर्डा खूनप्रकरणातील संशयित मुंबईला येऊ शकतात, असा संदेश त्यांची छायाचित्रे पाठवून मुंबई पोलिसांना देण्यात आला होता. मुंबई पोलिसांतर्फे प्रभारी पोलिस निरीक्षक निनाद सावंत, पोलिस निरीक्षक संजय निकम यांच्यासह गोवा पोलिस उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक, हेड कॉन्स्टेबल महेंद्र गावडे, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कासकर, चेतन कोळी यांच्या पथकाकडून शोध सुरू करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकांवर छायाचित्र दाखवून शोध सुरू केला असता शिवाजी पार्क परिसर, दादर पश्चिम भागात छायाचित्रातील व्यक्तींप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे पोहोचताच संशयित हातात बॅग घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर फातोर्डा प्रकरणातील तिघे तेच असल्याचे स्पष्ट झाले.

झारखंडला पळून जाण्याचा होता बेत

मुंबईत तिन्ही संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता केलेल्या कामाचे पैसे वेळेत न मिळाल्याने रागाच्या भरात मिंगेल मिरांडा व कॅटरिना पिंटो यांच्या डोक्यात लोखंडी घण घालून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. काही कालावधीतच झारखंडला जाणाऱ्या रेल्वेत बसून पळून जाणार होतो, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!