बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यानंतरही कोविड लक्षणे दिसल्यास घाबरू नका !

खास वेबिनारमध्ये डॉ. निखिल बांते आणि पोषण विशेषज्ञ ईशी खोसला यांचं मार्गदर्शन !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडमधून बरे झाल्यानंतर सुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर थकवा, अपचन, दीर्घकाळ अंगदुखी, स्नायूदुखी, छातीत धडधड होणे, अतिघाम येणे, दोन महिन्यानंतरही तोंडाला चव न येणे, नैराश्य ही लक्षणे दिसून येतात. योग्य आहार आणि नियमित व्यायाम, योग या माध्यमातून पूर्णपणे बरे होता येते. “कोविडमधून बरे झाल्यानंतर पोषण” या पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये डॉ. निखिल बांते आणि पोषण आणि आहारतज्ज्ञ इशी खोसला यांनी मार्गदर्शन केले, त्यात ही माहिती दिली.

कोविडमध्ये विषाणू केवळ फुप्फुसावर आघात करत नाहीत तर यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडावरही आघात करतो. त्यामुळे यातून पूर्णपणे बरे होण्यास जास्त कालावधी लागतो असे डॉ निखिल बांते यांनी सांगितले. विषाणूमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रीय (हायपर अ‍ॅक्टीव) होते, ज्यामुळे अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा त्रास जास्त कालावधीसाठी राहतो, असे डॉ बांते म्हणाले.

कोविडदरम्यान उपचारात शरीराचा ऱ्हास होतो. त्यामुळे बरे झाल्यानंतर समतोल आणि पोषक आहाराची आवश्यकता आहे. पोषक आहारामुळे शरीराचे डिटॉक्सीफिकेसन होते, अशी माहिती आहार आणि पोषणतज्ज्ञ इशी खोसला यांनी दिली. उपचारादरम्यान शरीराचा ऱ्हास झाल्यामुळे शरीरात दाह निर्माण होतो. त्यामुळे दाह शमन करणारा आहार असावा, असे त्या म्हणाल्या.

आहारात कार्बोहायड्रेटस, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भाज्यांमुळे फायबर मिळते. ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे, त्यांनी एकच वेळ आहार घ्यावा. आहारात प्रथिनांएवढेच स्निग्ध पदार्थांचे महत्त्व आहे. स्निग्ध पदार्थांमध्ये कच्चे नारळाचे तेल, तूप, ओमेगा-3 यास प्राधान्य द्यावे, असे श्रीमती खोसला यांनी सांगितले.

शक्यतो एकवेळच्या जेवणात सलाड आणि कच्च्या भाज्या मोठ्या प्रमाणावर असाव्या. कारण, कोविड उपचारादरम्यान असे दिसून आले आहे की, ज्या रुग्णांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 20 पेक्षा कमी आहे, त्यांना त्रास जाणवला. ज्या रुग्णांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 30 पेक्षा अधिक आहे, त्यांना कसलाही त्रास जाणवला नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘सी’, ‘डी’, जीवनसत्व असलेली फळे, झिंक, बी-कॉम्प्लेकस, मॅग्नेशिअम यांचा वापर असावा. पपई, सुके जर्दाळू, मशरुम यांचा प्रमाणात वापर करावा. तसेच सहज उपलब्ध असलेल्या तुळशी, गुळवेल, आद्रक, लसूण, कडूनिंबाची पाने, आवळ्याचा रस, मध, हळद, अश्वगंधा, काळी मिरी याचा काढा करुन प्यावा, असा सल्ला इशी खोसला यांनी दिला.

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी नियमितपणे मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. तसेच नियमित हलकासा व्यायाम, योग, ध्यानधारणा करावी. मद्य आणि साखरेची मात्रा जास्त असलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!