घाबरू नका, सर्वांना माफी, इस्लामिक कायद्यानुसार महिलांचं संरक्षण…

तालिबानच्या पहिल्या पत्रकार परिषदेत मोठा दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतरच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. काबुलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसच्या आतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. याआधी तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले होते. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद घेतली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची महिलांच्या बाबतीत असलेल्या चिंतेबाबत आपली भूमिका मांडली. तालिबानने मंगळवारी इस्लामिक कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना माफी जाहीर केली आहे. तालिबानने अफगाणिस्तान सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, संघटनेची सैनिकांना कोणाचाही सूड घ्यायचा नाही आणि सर्वांना माफ करण्यात आले आहे.

तालिबानने १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात महिलांच्या जीवन आणि हक्कांवर कठोर निर्बंध लावले होते. अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रवक्त्याचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तालिबानला खाजगी माध्यमे स्वतंत्र असावीत, पण पत्रकारांनी देशाच्या मूल्यांविरूद्ध काम करू नये, असेही मुजाहिद म्हणाले.

त्यांनी वचन दिले की तालिबान अफगाणिस्तान सुरक्षित करतील. त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी मागील सरकारसोबत किंवा परदेशी सरकार किंवा सैन्याबरोबर काम केले त्यांच्यावर कोणताही सूड उगवायचा नाही. आम्हाला इतर देशांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.

त्याच्या पहिल्या पत्रकार परिषदेत, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले: ‘आम्ही खात्री देतो की कोणीही त्यांच्या दारात जाऊन त्यांनी मदत का केली हे विचारणार नाही.’ त्याआधी तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्ला सामंगानी यांनी महिलांना सरकारमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करेल असे वचन दिले होते.

अफगाणिस्तान आपली जमीन इतर कोणत्याही देशाला लक्ष्य करण्यासाठी वापरू देणार नाही यावरही प्रवक्त्याने भर दिला. तालिबानने २०२० मध्ये अमेरिकेशी केलेल्या करारात हे आश्वासन दिले होते. या करारानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

अफगाणी नागरिकांना आधीच्या राजवटीसारखी परिस्थिती पुन्हा येईल याची भीती वाटत आहे. पण महिलांना इस्लामिक कायद्यानुसार अधिकार दिले जातील, असे सांगून मुजाहिद यांनी अनेक अफगाणिस्तान आणि परदेशी नागरिकांच्या प्रमुख चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!