कांचनगंगा सोसायटीत डॉक्टर्स, नर्सेसना मज्जाव

नर्सेस संघटनेने केला निषेध, कारवाईची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मडगाव येथील कांचनगंगा कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटीत कोविड-१९ ड्यूटीवर असलेल्या डॉक्टर्स तसेच नर्सेसना वास्तव्यास हरकत घेणारे सोसायटीचे चेअरमन हेमंत आंगले यांचे पत्र बरेच व्हायरल झालंय. अखिल गोवा नर्सेस संघटनेने या पत्राची गंभीर दखल घेतलीए. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून चेअरमनवर कारवाई करावी अन्यथा त्यांनी ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीए. यासंदर्भात त्यांनी पोलिस तक्रार दाखल करण्याचा पावित्रा घेतलाए.
मडगाव येथील या सोसायटीचे दोन फ्लॅट वंदना बोरकर यांच्या नावे आहेत. या दोन्ही फ्लॅटमध्ये नर्सेस तथा डॉक्टर्स राहतात, असं सोसायटीचे चेअरमन हेमंत आंगले यांनी केलेल्या पत्रात म्हटलं. नर्सेस आणि डॉक्टरांना इथे वास्तव्य करण्यास सोसायटीच्या नियमांत वर्ज आहे, असेही त्यांनी म्हटलंय. वंदना बोरकर यांनी आपल्या फ्लॅटमध्ये नर्सेस आणि डॉक्टरांना राहण्याची परवानगी दिलीए पण त्याबाबत सोसायटीला कळवले नाही. हे डॉक्टर्स आणि नर्सेस कोविड-१९ रूग्णांच्या सेवेत असून त्यांच्याच इस्पितळात काम करताहेत. या लोकांकडून सोसायटीच्या लोकांना हा संसर्ग होऊ शकतो आणि संपूर्ण सोसायटी संसर्गमय होऊ शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केलीए. या डॉक्टर्स तथा नर्सेसना इथे राहण्यापासून ताबडतोब बंद करा,असेही या पत्रातून सुचित करण्यात आलंय.
विशेष म्हणजे या पत्राच्या प्रती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मडगाव आरोग्यधिकारी, सहाय्यक निबंधक, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि फातोर्डा पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकांना पाठविण्यात आल्यात.

नर्सेस संघटनेकडून निषेध

देशभरात आरोग्य फ्रंटलाईन कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कोविड-१९ ची सेवा करत असताना ह्याच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना अशी वागणुक मिळणे हे दुर्दैवी आहे. कांचनगंगा सोसायटीच्या या पत्राचा निषेध करत असल्याचे नर्सेस संघटनेने म्हटले आहे. या सोसायटीच्या चेअरमननी ताबडतोब माफी मागावी,अशी मागणी करत सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी,अशी मागणी संघटनेने केलीए.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!