दोतोर, आम्हाला वाचवा !

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा प्रसार भयानक

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा प्रसार भयानक पद्धतीने सुरू आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनासंबंधीचे गांभिर्य हरवल्याने सर्वंचजण बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. ह्यातून प्रसाराचे प्रमाण दुप्पट होत असून एकूणच प्रशासनाची मानसिकताही संशयास्पद बनल्याची भावना लोकांची बनलीए. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत चाललीए तर दुसरीकडे इस्पितळात दाखल होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण तेवढेच वाढलंय. जीएमसी आणि दक्षिण गोवा कोविड इस्पितळ फुल्ल झालंय. सरकारकडूनही अधिकृत निवेदनं केलं जात नाहीए. राज्याचे नेतृत्व डॉक्टरकडे असल्याने आता सर्वसामान्य गोंयकार मात्र दोतोर, आम्हाला वाचवा, या भावनेतूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहे.

राज्य संकटाच्या दिशेने

गोव्यात गेल्या चोविस तासांत 4 कोविड रूग्णांचा मृत्यू झालाय. राज्य कोविडमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतरचा हा सर्वांत मोठा आकडा ठरलाय. विशेष म्हणजे बुधवारी आणखीन 78 रूग्णांची इस्पितळात रवानगी करण्यात आलीए. गेल्या चोविस तासांत 473 नव्या रूग्णांची भर पडून एकूण सक्रिय रूग्णांचा आकडा 5 हजार 112 वर पोहचलाय. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी दिवसेंदिवस घटत चाललीय. ही टक्केवारी आता 90.64 टक्क्यांवर पोहचलीय. गेल्या चोविस तासांत 245 रूग्ण बरे झाल्याची नोंद झालीए. एकूण मृतांचा आकडा 857 वर पोहचलाय. 2236 चाचण्यांचे अहवाल अजूनही यायचे बाकी आहेत. हळूहळू कोरोना रूग्ण कोविड केअर सेंटरचा आधार घ्यायला सुरूवात झालीए. उत्तर गोव्यात 275 पैकी 256 खाटा अजूनही बाकी आहेत तर दक्षिण गोव्यात 144 खाटांपैकी केवळ 83 खाटा बाकी आहेत. रेल्वे, विमान तसेच रस्तामार्गे गोव्यात आलेले एकूण 25 रूग्ण सापडलेत. मडगावात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चाललीए. तिथे 591 रूग्ण झालेत. यानंतर पर्वरीत- 484, कांदोळीत- 344, म्हापसा-341, कुठ्ठाळी-265, वास्को-239, फोंडा- 387, पणजी- 322 अशी सर्वांधिक आकडेवारी आहे. आता हळूहळू शहरांपासून कोरोना रूग्णांची संख्या ग्रामिण भागांतही वाढत चालल्याने चिंतेत अधिक भर पडलीए.

राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी

राज्यात सध्या वैद्यकीय इमर्जन्सी लागू झालीए. जीएमसी, द.गो. कोविड इस्पितळ तसेच सर्वंच वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण वाढलाय. पहिल्या लाटेतून नुकताच कुठे सुटकेचा श्वास घेतो तोच ही दुसरी लाट येऊन आदळलीय. ही लाट पहिल्यापेक्षा अधिक भीषण आहे. जीएमसीचे प्रशासकीय संचालक दत्ताराम देसाई यांनी एका आदेशाव्दारे जीएमसी कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द केल्यात. विशेष म्हणजे मागील वर्ष या सर्व कर्मचाऱ्यांनी अविरत काम केलंय आणि आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्यानं त्यांच्यासमोरही संकट ओढवलंय. सरकारने मोठ्या थाटात या कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर केली होती ती देखील न देता त्यांची फसवणूक केल्याची भावना अजूनही या कर्मचाऱ्यांच्या मनात ताजी आहे.

लॉकडाऊन नाही, पण जीवाचं काय?

बुधवारी सकाळीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन जारी करणार नाही,असं विधान केलंय. त्यांना म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसं सांगितलंय. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प होणार. पण जनतेनं मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असा सल्ला त्यांनी दिलाय. आपले मुख्यमंत्री हे स्वतः डॉक्टर आहेत. जनतेनं मार्गदर्शक तत्वाचं पालन करावं असा सल्ला देताना राजकीय नेते, राजकीय पक्ष तसेच इतर समाजातील जबाबदार लोकांनीही या मार्गदर्शक तत्वाचं पालन करावं, हे ते का सांगत नाहीत,असा सवाल जनता करतेए. कोरोना हा काही ठरावीक लोकांनाच होतो असं नाही पण मग मास्कचा वापर न करणे, राजकीय मेळावे, बैठका घेणे, कार्यक्रम करणे आदी बिनधास्तपणे सुरू असताना कोरोना प्रसाराचे खापर सर्वसामान्य जनतेच्या माथी मारून सरकार नेमकं काय सांगू पाहत आहे,असा सवालही आता संतप्त लोक करताना दिसताहेत.

पंतप्रधानांचे कोण एकतोय..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंबंधीच्या बैठकीत काही महत्वाच्या टीप्स सांगितल्याहेत. त्यात पहिली गोष्ट म्हणजे चाचण्यांचे प्रमाण वाढवणे. राज्यात दरदिवशी अडीज ते तीन हजार चाचण्या होताहेत ही चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाबाधीत रूग्णांचा शोध लावून त्याचा प्रसार रोखण्याबाबत सध्या काहीच घडताना दिसत नाहीए. पणजी, पर्वरी, कांदोळी, फोंडा, मडगाव आदी शहरांत पाचशेंवर आकडा गेला तरी मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यासही सरकार तयार नाहीए. कोरोनाबाधीत कोविड केअर सेंटरमध्ये जात नाहीएत. ते घरीच विलगीकरणात असतील तर मग आरोग्य खात्याचे त्यांच्याकडे लक्ष आहे काय, कोरोना किट त्यांच्यापर्यंत पोहचतंय का, विलगीकरणाच्या मार्गदर्शक तत्वाचं त्यांच्याकडून पालन होतंय का, या प्रश्नांची उत्तरेच कुणी देताना दिसत नाहीए. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीनं सुरू असलेली प्रक्रिया ठप्प झाली आहे. मग सरकारने कोरोना प्रसाराला वाट मोकळी करून दिलीए की काय,असाही सवाल आता उपस्थित करावा लागतोय.

बरे होण्याची टक्केवारी घटतेय

राज्यात 1 मार्च 2021 रोजी बरे होण्याची टक्केवारी 97.49 टक्के होती. 13 एप्रिल 2021 रोजी हीच टक्केवारी घटून 90.94 टक्क्यांवर येऊन ठेपलीए. एक आरोग्यमंत्री केवळ कोविड तज्ज्ञ समितीकडे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे दिसून येतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या रोजच्या बैठका खरंच होताहेत काय किंवा होताहेत तर नेमके काय निर्णय घेतले जाताहेत हे देखील सर्वसामान्य लोकांना कळायला मार्ग नाही. या एकंदर परिस्थितीत सर्वसामान्य गोंयकार मात्र चिंतेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!